मुंबई पाऊस: मुसळधार पावसाचा इशारा, राज्यातल्या इतर भागातही पावसाची शक्यता

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (13:52 IST)
मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
 
बुधवारी सुरू असलेली पावसाची रिपरिप गुरुवारपर्यंत सुरूच होती. गुरुवारी सकाळपर्यंत मुंबईत 65 ते 115 मिमी पावसाची नोंद झाली. तर ठाणे जिल्ह्यातही बुधवार सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला.
 
जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात दिलासा मिळाला. भातसा धरण 70 टक्के तर बारवी धरण 66 टक्के भरलं आहे. तर ठाणे शहरात काही ठिकाणी वाहतूक मंदावली. पाच झाडं पडल्याच्याही घटना घडल्या.
 
पालघर जिल्ह्यातलही गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातले वैतरणा, तानसा, सूर्या, सुसरी अशा सर्व नद्या, नाले तुडुंब भरले आहेत. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराची शक्यता नाकारता येत नाही.
 
पुण्यातही काल दिवसभर पाऊस होता. शहरात संध्याकाळपर्यंत 9.8 मिमी पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून गुरुवारी संध्याकाळी साडे सोळा हजार क्युसेक्स वेगाने मुठा नदीत विसर्ग करण्यात आला. आज आणि उद्या पुणे शहरात मध्यम स्वरुपाचा तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
 
आज शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
 
राज्याच्या इतर भागांमध्येही काल दिवसभर पाऊस होता. सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, अमरावती आणि गोंदिया या शहरांमध्येही जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 78 मिमी पावसाची नोंद झाली.
 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि गुजरावरच्या हवेच्या चक्रीय परिस्थितीमुळे राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात मोसमी वारे सक्रीय झाले आहेत.
 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने मुंबई आणि परिसरात तसंच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे.
 
ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या महिनाअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटवरून दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती