मुसळधार पावसाने मुंबईत एकाचा बळी घेतला, पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता

बुधवार, 28 जून 2023 (15:17 IST)
मान्सूनचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आयएमडीने म्हटले आहे की, महाराष्ट्रात 4 जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
मुंबईतील मालाड परिसरात मुसळधार पावसामुळे उन्मळून पडलेले झाड एका 38 वर्षीय व्यक्तीवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती देताना मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, कौशल दोशी असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
 
मुंबईत आजपासून पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सखल भागांना भेटी देण्याचे आदेश दिले आहेत.
 
मुसळधार पावसामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. बीएमसीने अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
IMD ने बुधवारी गोव्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 3-4 तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी वाऱ्याचा वेग सुमारे 40 ते 50 किमी प्रतितास राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती