आरोग्य चाचणी आता रेल्वे स्थानकांवर

सोमवार, 20 जुलै 2020 (11:10 IST)
करोना संकटकाळात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १२ रेल्वे स्थानकांवर आरोग्य चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने Central Railway घेतला आहे. करोनावर मात करण्यासाठी रेल्वे स्थानकावर हेल्थ एव्हीएम (स्वयंचलित वेडिंग मशीन) कार्यान्वित करण्यात येतील. त्यावर मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌ज उपलब्ध होणार आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर एव्हीएम बसवण्यात येणार आहे. प्रवाशाला नवीन मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌जची आवश्यकता असेल तर कोविड-१९ Covid-19 प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडिंग मशीन डिस्पेंसरमधून त्वरित मिळवता येतील. नाममात्र किंमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर बाटली आणि ग्लोव्ह्‌ज देण्यात येतील. हे एव्हीएम नवीन इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम (एनआयएनएफआरआयएस) अंतर्गत विविध स्थानकांवर उघडली जातील. आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रेल्वेगाड्यांमधून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
 
अन्य स्थानकांतही सुविधा मिळणार
प्रवाशांच्या आरोग्याच्या पॅरामीटर्सची त्वरित तपासणी करून घेण्यासाठी मुंबई विभागातर्फे कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हेल्थ एटीएम कियोस्कचे काम सुरू आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर इत्यादी १२ उपनगरी स्थानकांवर हेल्थ एटीएम बसविण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.
 
सवलतीत चाचणी
ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि इतर आरोग्याशी संबंधित १६ ते १८ प्रकारची आरोग्य तपासण्या प्रवाशांना करता येईल. या केंद्रात प्राथमिक प्रयोगशाळेच्या चाचणी व आपत्कालीन सुविधांनी सुसज्ज असेल आणि त्यामध्ये वैद्यकीय परिचारक कर्मचारी असतील. या आरोग्य एटीएमद्वारे देण्यात येणाऱ्या बेसिक स्क्रीनिंग सेवांमध्ये १६ पॅरामीटर्स केवळ नाममात्र रु.५० मध्ये तसेच हिमोग्लोबिन आणि ब्लड शुगरची भर घातल्यानंतर १८ पॅरामीटर्सची चाचणी १०० रुपयांत होऊ शकणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती