कोरोना योध्द्यांसाठी सुरू होणार समन्वय कक्ष

सोमवार, 12 एप्रिल 2021 (20:11 IST)
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉक डाऊन कालावधीत अहोरात्र अविरतपणे सेवा देणाऱ्या महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कोरोना योध्द्यांसाठी तातडीने 'कोव्हीड- 19 समन्वय कक्ष ' स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिले आहेत. 
 
कोविडच्या या काळात महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचारी हे अविरतपणे ग्राहकांना आपली सेवा देतात.  सद्यस्थितीत उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या या संकटांत या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी  ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या आदेशानुसार,प्रत्येक परिमंडळ कार्यालयात ' कोव्हीड- 19 समन्वय कक्षा ' ची स्थापना करण्यात येणार आहे. 
 
गेल्या वर्षी कोरोनाचे भीषण संकट असूनही जीवाची पर्वा न बाळगता महानिर्मिती, महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी राज्याला अखंडित वीज पुरवली. या काळात कोरोनाने जवळपास ६० कर्मचाऱ्यांचा जीवही गेला. यावर्षी कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांना तातडीने मदत व उपचार मिळावे यासाठी डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले आहेत.
 
एखाद्या कर्मचाऱ्याला  कोरोनाचा संसर्ग झाल्यास तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी खाटा आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध व्हावी, तसेच या वीज कंपन्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, सोबतच विविध आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड- 19 समन्वय कक्षातून तातडीने मदत उपलब्ध केली जावे असे निर्देशही डॉ राऊत यांनी दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती