तूच गं नारी .....

तू चंचला, पर्वतरांगात, दर्‍याखोर्‍यात उगम पावणारी, इवल्याशा प्रवाहाप्रमाणे वाहणारी,  डोंगरदर्‍यात खळाळणारी, वाटेत येणार्‍या प्रत्येक दगडधोंड्यालाही स्पर्शून आणि सोबत येणारं सारं काही घेऊन तशीच पुढे झेपाणारी. डोंगरावर कधी नागमोडी वळणं घेणारी तर कधी कडेकपारीतून बरसणारी. झाडाझुडपाला हिरवंगार करणारी, इवलंसं तुझं युस्वातीचं रूप पुढे पुढे सरकेल तसं अधिकाधिक विलोभनीय भासणारी.

तू चंचला, लहानशा झर्‍याचा खळाळता धबधबा होणारी आणि तोच घबधबा पुढे पुढे जाईल तसा थोड्या शांत प्रवाहात वाहणारी. तसंच पुढे जाऊन वाटेत येणार्‍या छोट्या मोठ्या प्रवाहांना सोबत घेऊन पुढे जाणारी. सवंगड्यांच्या सोबतीने थोडीशी विसावणारी, खळाळत्या  रूपातून नकळतपणे संथ वाहत्या रूपात होणारी.

तू सुजला, दोन्ही तीरांना जीवन देणारी. चीहीकडे जलसमृद्धी देणारी. शेतीमुळे फुलवणारी. 

तू संजीवनी, सकल चराचराला नवसंजीवनी  देवविणारी, सर्वांची तहान शमविणारी आणि असंच पुढे जाऊन स्वत्व विसरून सागरला जाऊन भेटणारी.

तू अर्पिता, स्वत:चं अस्तित्व क्षणात विसरून सागरमय होणारी. तुझ्या गोड पाण्याचा  प्रवाही आवेग तसाच समुद्राच्य फेसाळत्या खार्‍या लाटांमध्ये लोटून देणारी आणि तसंच त्याच्याच लाटांवर अनिवारपणे स्वार होणारी.

तू मनस्विनी, सर्वस्वाने स्वत्व अर्पूनही पुन्हा नव्या  रूपात दाखल होणारी. सागराशी एकरूप होणारी आणि त्या उत्कट मिलनाची धग सोसून कुणालाच न सांगता अदृष्यपणे आभाळात झेपावणारी. इथलं सगळचं आभाळात धाडणारी आणि लख्खकन् चमकून पुनश्च्य बरसणारी. त्या तिथेच पर्वतरागांता, दर्‍या-खोर्‍यात नव्याने उगम पावणारी.

अगदी तशीच तू मुक्ता - आईवडिलांच्या मायेत वाढणारी. अल्लडपणे घरभर नाचणारी. नाजूक नाजूक पावलांनी धावून अख्खं अंगण आणि घर डोक्यावर घेणारी. पायातले पेंजण छुमछुम करत नाचणारी. खणाचं परकर-पोलकं, हातात छान बांगड्या घालून नट्टापट्टा करून घरातल्या सगळ्या मंडळींना सुखावणारी. 

तू मुग्धा, इवल्या इवल्या हातांनी भातुकली मांडणारी आणि ताई-दादासवे लुटूपुटू भांडणारी. बाबांच्या गळ्यात पडून लाड करून घेणारी. बाहुलीसोबत बडबड करून खेळणारी. आईची प्रतिकृती होणारी.

तू रसिका, इवली इवली पावलं आता मात्र गावभर फिरणारी. शाळा, अभ्यास करून  अनेक सवंगडी जमवणारी. कला, अभ्यास आणि हर प्रांतात मुशाफिरी अन् हर क्षेत्रात चमकणारी. सख्यांसोबत रमणारी. तरीही रात सुखावणारी. स्वत:चाच आरसा होणारी. हरेकाला जोडणारी, जगाशी नाते सांधणारी, प्रत्येक नाते आपुलकीने बांधणारी. 

तू प्रेमिका, लौकिकाचा ध्यास धरणारी तरीही अलौकिक शोधणारी अन् अद्वैत साधणारी. स्वत्व विसरून सर्वस्व अर्पून एकरूप तादात्म्य पावणारी. नव्या घरी नवी रुजवात करून नव्या आयुष्याला सुरुवात करणारी. प्रत्येक नातं नव्याने जगणारी आणि जपणारी. सृजनोत्सव करणारी.

तू देविका, घराघराला, मनामनाला सांघणारी. क्षणाक्षणाला, कणाकणाला धेदणारी. अद्वितीय अद्वेत्तत्व फक्त तूच जाणणारी आणि जगणारी. ते फक्त तूच जपणारी अन् दिल्या घेतल्या वचनांना फक्त तूच जागणारी... फक्त तूच गं नारी..... 

मंजिरी सरदेशमुख

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती