मराठी कथा : अगतिक

मी त्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये नगर जिल्ह्यात प्रवदा नदीच्या काठावरच्या संगमनेर या गावी मेडिकलचा फायनल इयरचा अभ्यास करीत होतो. मी अहमदनगरच्या मेडिकल कॉलेजमध्ये होतो. तिथे होस्टेलच्या रूम्स फार महाग असल्यामुळे मी संगमनेर या गावी एक खोली घेऊन राहत होतो. माझे घरमालक म्हणजे या घराचे मालक सुधाकर राव हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले या गावाचे रहिवासी होते. पण संगमनेर तालुक्यात नोकरी लागल्यामुळे ते या गावी आले होते. ते तालुक्यात महसुल विभागात एल. डी. सी. होते. त्यांच्या आजोबांनी कधी काळी या क्षेत्रात एक जुनाट पद्धतीचे मोठे घर घेऊन ठेवले होते. ते आज त्यांच्या कामी आले होते.  
 
सुधाकर पंचवीस वर्षांचा तरुण होता. मनाने साधा, सरळ, कुणाच्या अध्यात न मध्यात. आपण बरे की आपले काम बरे, हा त्याच्या जीवनातला साधा सरळ हिशोब. मी त्यांचा भाडेकरू म्हणून तो कधी-कधी माझ्याशी थोडं बोलायचा. असंच एकदा त्याने मला बोलता बोलता जवळ-जवळ लाजतच सांगितलं की त्याचं लग्न ठरलं आहे. मुलगी कोकणातल्या केळशी गावाची आहे. कमी शिकलेली म्हणजे अगदीच दहावी पास. पण कुलिन, सुसंस्कारी व देखणी आहे. मी सुधाकरचं लग्न ठरल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं. त्याने सांगितलं की मुलीच नाव अनया आहे. मी म्हटलं, 'भाऊ, मी वहिनींना 'अनू वहिनी' म्हणेन. चालेल ना तुला?' काही दिवसांनी सुधाकर लग्न करून अनया म्हणजे आमच्या अनू वहिनींना घरी घेऊन आला.
 
अनू वहिनी खरंच सुरेख होत्या. गोड बोलणं, प्रेमळ स्वभाव व मनामध्ये दाटलेला निष्पाप भोळेपणा. त्यावर कुणीही त्यांच्याकडे आकर्षित होत असे. निश्चितच सुधाकरही वहिनीच्या याच गुणांनी वेडे झाले असतील. पण खरं सांगू मलाही अनू वहिनीच आकर्षण वाटू लागलं होत. एखाद्या दिवस त्या दिसल्या नाही किंवा काही बोलल्या नाही तर उगीच चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. 
 
मी वहिनींना म्हणायचो 'वहिनी तुमचं असंच लाघवी रूप आणि प्रेमळ स्वभाव आहे. तुम्ही एक कुशल नर्स बनू शकता. तुमच्या सारखी प्रेमळ नर्स असिस्टंट म्हणून ठेवताना कोणत्याही डॉक्टरला आनंदच वाटेल. कोणाही पेशंटला तुमच्याकडून इलाज करायला बरंच वाटेल. अनु वहिनी तुम्ही शिका. मी तुम्हाला हवी ती मदत करेन'. अनू वहिनी माझ्या म्हणण्याला हसून घालवून द्यायच्या. 
 
असेच दिवस जात होते. अचानक एका रात्री सुधाकर भाऊ बाहेर गांवातून घरी पाण्यामध्ये भिजत-भिजत आले. त्यांना जोराचा ताप भरला मी त्यांना तपासलं, इंजेक्शन लावलं, काही गोळ्या दिल्या. पण सुधाकरचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. मी वहिनींना म्हटलं की इंजेक्शन दिले आहे आणि झोपेच्या गोळ्याही दिल्या आहेत. दोन तासांनी ताप उतरेल व शांत झोप लागेल. मी शेजारी खोलीमध्ये जागाच आहे काही लागलं तर मला बोलवा मी लगेच येईन, इतकं सांगून मी आपल्या रूममध्ये येऊन अभ्यास करू लागलो. 
 
नंतर अचानक रात्री दोन वाजता वहिनीचा ओरडण्याचा आवाज आला. 'भावजी-भावजी हे पाहा कस करताय?' मी धावत गेलो पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. सुधाकरचे डोळे पांढरे झाले होते. शरीर निष्प्राण झालं होतं. मी त्याचे डोळे मिटले व वहिनींना म्हटलं 'वहिनी भाऊ आपल्याला सोडून निघून गेले.' 
 
वहिनींवर जणू आकाशच कोसळलं होत. त्या जीवाच्या आकांताने रडत होत्या. मी त्याचं सांत्वन करीत होते. शेजारी पाजारी आले आम्ही सर्वांनी मिळून सुधाकर भाऊंचे अंत्यसंस्कार केले. 
 
त्यांच्या नातेवाईकांना कळवायचे म्हणजे, त्यांचे एकमेव नातेवाईक त्यांचे वडील रावसाहेब पुरंदरे. ते तिथून सातशे मैल लांब कोंकणामध्ये राहत होते. त्यांना यायलाच तीन दवस लागले असते. मी त्यांना तार करून सुधाकरच्या मृत्यूची दुःखद वार्ता कळवली. 
 
चवथ्या दिवशी रावसाहेब आले त्याचं एकंदर रूप म्हणजे कमरेला राजापुरी पंचा, अंगावर उपरणं, पायात चपला, गोटा केलेल्या डोक्यावर ठेवलेली लांब शेंडी, घनदाट मिशा आणि घारे आणि भेदक डोळे असा होता. चेहर्‍यावरूनच मनुष्य बेरकी दिसत होता. मी त्यांना नमस्कार केला व सांगितले की मीच तुम्हाला तार केली होती. ते म्हणाले, 'बरं बरं ठीक आहे आता घरच सर्व मी पाहून घेईन. तुम्ही तुमचं काम करा.' त्यांचं असं बोलणं मला विचित्र वाटलं. नंतर दोन दिवसांनी रावसाहेबांचं आपल्या सुनेशी जोराजोराने बोलणं माझ्या कानावर येत होत. ' हे पाहा सूनबाई माझ्या घराचं पाहायला मी समर्थ आहे. माझ्या घरामध्ये कोणी दुसर्‍याची लुडबुड मी अजिबात सहन करणार नाही. शेजारच्याची तर नाहीच नाही, उद्या तुला आपल्या गावी चलायचं आहे.' 
 
माझ्या आणि अनुवहिनीबद्दल त्यांना कोणी काय सांगितले होतो कोण जाणे. त्याच रात्री मला अनू वहिनीच्या घराचून त्यांच्या जोरजोराने किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अस वाटत होत त्या कशाला तरी विरोध करत होत्या. पण त्यांचं काही चालत नव्हतं. 
 
मी खिडकीतून डोकावून पाहिलं. रावसाहेबांनी घराची दारं आतून बंद करून घेतली होती. त्यांनी अनू वहिनींचे हात मागून धरून ठेवले होते त्या जमिनीवर गुडघे टेकून बसल्या होत्या. एक न्हावी वस्तर्‍याने त्यांच्या डोक्याचे केस काढत होता. 
 
मी ओरडलो, 'अरे चांडाळांनो सोडा तिला'. पण त्या दोघांनी माझ्याकडे लक्षच दिल नाही. मी दार ठोठावत होतो पण त्यांनी माझ्याकडे पहिलंही नाही. पाहता पाहता त्या न्हाव्याने अनुवहिनीचे डोक्याची सर्व लांब सुंदर केस काढून त्यांना बोडकी करून टाकली. दुसर्‍या दिवशी सकाळी अनुवहिनी लाल लुगडं घालून आपलं बोडकं डोकं झाकत टांग्यात बसल्या होत्या. रावसाहेब त्यांचं सामान टांग्यात चढवीत होते. आता त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या गांवी जाऊन लोकांच्या घरी स्वयंपाक करूनच घालवायचा होता. त्या माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होत्या जणू मला म्हणत होत्या भावजी तुम्हीच मला शिकवून नर्स बनवणार होता, तुम्हीच मला आत्मनिर्भर करणार होतात पण तुम्हीपण कमकुवत निघाला, मला वाचवू शकला नाही. 
 
मी डॉक्टरीच्या अभ्यासात किती तरी आपरेशन्स केली. किती तरी देहांची चिरफाड केली. पण आज अनुवहिनीच्या डोळ्याला डोळ्या भिडवायची माझी हिंमत नव्हती. 
 
जीवनामध्ये इतका अगतिक मी कधीच झालो नव्हतो.
 
- प्रकाश दांडेकर 

वेबदुनिया वर वाचा