खरं प्रेम खरंच असतं....

© ऋचा दीपक कर्पे

बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (12:13 IST)
खरं प्रेम खरंच असतं!!
कधी ओल्या मातीच्या गंधात 
कधी हिरव्या पानांच्या देठात
कधी नाजूक फुलाच्या रंगात
तर कधी फुलपाखरांसोबत
वार्‍यात तरंगत असतं..
 
खरं प्रेम खरंच असतं!!
कधी निरभ्र आकाशात
कधी तांबड्या क्षितिजात
कधी मुसळधार पावसात
तर कधी नक्षत्रांसोबत
अंतराळात झगमगत असतं...
 
खरं प्रेम खरंच असतं!!
कधी अथांग सागरात
कधी शंख शिंपल्यात
कधी उंचावणार्‍या लाटांत
तर कधी भुरकट वाळूसोबत
सूर्यप्रकाशात झळकत असतं...
 
खरं प्रेम खरंच असतं!!
कधी झाडावरील घरट्यात
कधी कोकिळेच्या स्वरात
कधी रंगीत मोरपिसार्‍यात
तर कधी पाखरांसोबत
आकाशात भरारी घेत असतं...
 
खरं प्रेम खरंच असतं!!
कधी बासरीच्या स्वरात
कधी कवितेच्या शब्दांत
कधी आकर्षक चित्रात
तर कधी रांगोळीच्या रंगांसोबत
अंगणात मिरवत असतं..
 
खरं प्रेम खरंच असतं
कधी देवळाच्या गाभाऱ्यात 
कधी तेवणार्‍या निरांजनात
कधी चंदनाच्या सुवासात
तर कधी वेदमंत्रासोबत
देवघरात वावरत असतं
 
खरं प्रेम खरंच असतं!!
खरं प्रेम खरंच असतं.....!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती