आई

बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (15:54 IST)
गोड गोड पुरणपोळी वर तूप म्हणजे आई
पृथ्वी वरती देवाचं रूप म्हणजे आई
आई असते खमंग थालीपीठा वर लोणी
 
तिच्यातूनच जन्मते जीवनाची कहाणी
मऊ मऊभातावरचं आई असते मेतकूट
 
सहन होत नसते तिच्या पासून ताटातूट
पांढर्या शुभ्र भातावर आई असते वरण
 
भुकेलेलं जग सारं तिला जातं शरण
आई असते तव्यावरची गरमागरम पोळी
 
आपण बोललो तिखट तरी ती लिमलेट ची गोळी
आई घट्ट माया जणु अवीट बासुंदी
 
आई असते किलबिलणार्या पक्षांची फांदी
खूप खूप आवडीचं चॉकलेट महणजे आई
 
न भांडता वाटून घ्या सांगत असते आई
आयुष्याच्या उन्हाळ्यातलं आईसक्रीम असते आई
गारवा देता देता वितळत राहते आई.......

वेबदुनिया वर वाचा