ब्रेकअप करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

गुरूवार, 10 जून 2021 (12:41 IST)
दोन प्रेम करणार्‍यांमध्ये काहीना काही कारणांमुळे ब्रेकअप होतं. काही लोक असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतात तर काहींना हेच हवं असतं. अलीकडे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून नातं संपवण्याची भाषा केली जाते. पण हे नातं संपवताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. असे केल्याने तुमच्या नात्यातील सहजता टिकून राहते आणि यामुळे भविष्यात नातं जोडण्याला मदत मिळते. पण नातं तोडताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने तोडलं तर ते तुम्हाला फार महागात पडू शकतं. कारण रागाच्या भरात काहीही केलं आणि बोललं जातं. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी...
 
चुकीच्या भाषेचा वापर करू नये
कोणतंही नातं तोडण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेऊ नये. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्यातला सगळ्यात चांगला वेळ घालवला त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप करताना चुकीची भाषा वापरू नये. शांतपणे आणि चर्चा करूनही हे केलं जाऊ शकतं. कारण ते म्हणतात ना की, धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही.
 
नात्याची खिल्ली उडवू नका
नातं टिकवण्याचा शक्य तो प्रयत्न करावा पण जर हे शक्य नसेल तर नात्याची सार्वजनिकपणे खिल्ली उडवू नये. असे केल्याने भविष्यात तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला अडचण निर्माण होऊ शकते. त्यासोबतच या स्थितीचा दुसरं कुणी फायदाही उचलू शकतो.
 
मैत्री कायम ठेवा
जर तुम्हाला ब्रेकअप करायचं असेल तर असं करा की, त्या व्यक्तीसोबत तुम्ही कधीही मैत्रीपूर्ण वागू शकाल. एकमेकांना टाळून काही फायदा नाही त्यापेक्षा चांगले मित्र बनून राहा. याने तुम्हा दोघांनाही त्रास होणार नाही. फक्त सोबत असताना हे ध्यानात ठेवा की, आता तुम्ही मित्र आहात.
 
शांतपणे करा ब्रेकअप 
अलीकडे एक ट्रेन्ड बघायला मिळतोय की, लोक ब्रेकअप करण्यासाठीही डेटिंगचा आधार घेतात. ज्याप्रमाणे लोक प्रेमाच्या नात्याची सुरुवात डेटिंगने करतात तसंच आता डेटिंग करुन ब्रेकअप करतात. उगाच भांडण करून किंवा आरडाओरडा करुन नातं तोडत नाहीत.
 
खासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करु नका
ब्रेकअपनंतरही तुम्ही जर तुमच्या एक्सच्या संपर्कात असाल तर दोघांनीही एकमेकांच्या खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसवू नये. कारण आता दोघांनाही तो अधिकार राहिलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती