एटीएम:हे आले कोठून?

बुधवार, 6 मे 2020 (15:20 IST)
गरज ही शोधाची जननी असते हे आपल्या अॅटोमॅटिक टेलर मशीन म्हणजे एटीएम मशीनच्या शोधाबाबतही लागू आहे. एटीएम मशीनचा पहिला वापर लंडनमध्ये 27 जून 1967 रोजी बार्कलेज बँकेत केला गेला आणि या यंत्राचा शोध लावणारा माणूस जॉन शेफर्ड बॅरन याचा जन्म भारतात झाला होता. बॅरन हा स्कॉटलंडचा रहिवासी होता. त्याचा जन्म 23 जून 1925साली मेघालयची राजधानी शिलाँग येथे झाला होता.
 
या मशीनचा शोध लावण्यासाठी अगदी किरकोळ घटना कारणीभूत ठरली. म्हणजे बॅरनला पैसे काढायचे होते पण बँकेत पोहोचपर्यंत त्याला 1 मिनिटाचा उशीर झाला आणि बँक बंद झाली. तेव्हाच त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की चॉकलेट देणार्या व्हेंडींग मशीनप्राणे लोकांना चोवीस तास कधीही पैसे मिळू शकतील, असे यंत्र तयार केले तर? नुसती कल्पना करून तो थांबला नाही तर त्याने खरेच असे यंत्र तयार कले. वास्तविक 1960 साली एटीएम प्रमाणेच न्यूयॉर्क फर्स्ट नॅशनल सिटी बँकेने म्हणजे आताच्या सिटी बँकेने बॅकोग्राफ नावाचे मशीन तयार करून वापरता आणले होते. मात्र, त्यातून पैसे काढता येत नसत. नागरिक लिफाफ्यात पैसे, नाणी, चेक ठेवून ते या मशीनध्ये टाकून आपली बिले चुकती करू शकत.
 
पहिले मशीन तयार झाले तेव्हा व्हाऊचर बँकेतून घेऊन पेमेंट करता येत असे. बॅरनने तयार केलेल्या पहिल्या एटीएममध्ये कार्डचा वापर केला. मात्र, तेव्हाही प्रत्येकवेळी हे कार्ड बँकेकडून अगाऊ घ्यावे लागत असे कारण एक कार्ड एकदाच वापरता येई. नंतर त्यात सुधारणा होत होत आताचे एटीएम अस्तित्वात आले. भारतात पहिले एटीएम मुंबईत एचएसबीसी म्हणजे हाँगकाँग अॅ्न्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने आणले आणि आजघडीला भारतात एटीएमची संख्या 2 लाख 30 हजार मशीन्सवर पोहोचली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती