पांढरी काठी नव्हे- 'जीवनरेखा'

PR
PR
आज, 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन- पांढरी काठी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. नियतीने डोळ्यातल्या प्रकाशज्योती हिरावून घेत ज्या अंध बांधवांचे आयुष्य अंधःकारमय करून टाकले आहे, त्यांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण आणेल अशी, आपण प्रार्थना करू या...

डोळ्‍यावर काळा चष्मा अन् हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे, चालत्या रेल्वेत खेळणी विकणारे अंध बांधव आपण पहातो. त्यांच्या हातातली वरचा भाग लाल व खालच्या बाजूला पांढरी असलेली 'पांढरी काठी'च आता यांची 'जीवनरेखा' (Life Line) म्हणून राहिली आहे. अंध बांधवांना अंधःकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी 'पांढरी काठी' ही 'नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड' (नॅब) या समाजसेवी संस्थेने बहाल केली आहे. अंध व्यक्तींना दिशा दाखविण्याचे काम ही पांढरी काठी करते. समाजाला अधिक संवेदनाक्षम, सहृदय होण्याचा एकप्रकारे संदेश ही 'पांढरी काठी' देत असते.

'डोळा' हा अवयव शरीरात असूनही तो निकामी झालेल्या या मंडळींसाठी 'पांढरी काठी' म्हणजे त्यांना लाभलेले एक अवयवच आहे. अंधबांधवांचा खचलेला आत्मविश्वास या 'पांढरी काठी'ने वाढविला आहे. आता तर ती त्यांची आयुष्याची साथीदार झाली आहे.

अल्युमिनियमची काठी 110 रुपये व लाकडी काठी 24 रु. या मुळ किंमतीत 'नॅब'तर्फे 'ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. अंध व्यक्तीचे डोळे समोरच्या व्यक्तीला विद्रूप दिसू नये, म्हणून काळा चष्मा अवघ्या 15 रुपयात उपलब्ध करून दिला जात असतो.

गेल्या काही वर्षांपूर्वी अंध व्यक्तीला कुणाच्या तरी आधाराची गरज भासत होती. कारण एकच की, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव! मात्र 6 ऑक्टोबर, 1964 ला हा दिवस 'पांढरी काठी सुरक्षा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आणि जगभरातल्या बहुतेक देशांनी आपापले स्वतंत्र कायदे करून पांढर्‍या काठीला अंधांची 'आयडेंण्टिटी' म्हणून मान्यता दिली. 15 ऑक्टोबर हा दिवस जगभर 'पांढरी काठी सुरक्षा दिवस' म्हणून साजरा होऊ लागला.

आज साधारणपणे छातीपर्यंत उंचीची, एकसंघ किंवा घडीची पांढरी काठी हातात घेतल्यामुळे पुढे येणारे चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे-मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसं असे काठीच्या परिक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे त्या अडथळ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच काठीमुळे त्यांच्या सहज लक्षात येतात. परिणामी घरातून बाहेर पडणार्‍या या व्यक्तींना शाळा- कॉलेज, नोकरीव्यवसायाच्या ठिकाणी, बाजार किंवा हव्या असलेल्या ठिकाणी जाऊन इच्छित कार्य साध्य करणं आता या पांढर्‍या काठीमुळे सहजशक्य झालं आहे.

अंध बांधवांना 'संवेदना' हेच विशेष इंद्रिय परमेश्वराने बहाल केले आहे. अशा व्यक्तींना दिसत नाही, मात्र ते अतिशय सूक्ष्म आवाज-स्वर कानाने ऐकू शकतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रयाने -नाकाने परिसराचा वास घेवू शकतात आणि अचूक स्मरणातही ठेऊ शकतात. दृष्टी नसल्याने निसर्गाने त्यांना जणू जास्त संवेदनेचे विशेष इंद्रिय बहाल केलेले असावे. टाचणी वा सुई खाली पडली तरी त्यांना तिचा आवाज येऊ शकतो. त्वचा, नाक, कानाचा सहाय्याने ते परिसराची माहिती देऊ शकतात. उदा. रेल्वेगाडीचा वेग कमी झाला की पुढे स्टेशन येणार हे ते सहज ओळखतात. काठीच्या आधाराने ते रस्ता खडबडीत आहे की, दलदल हेही ते ओळखतात. एखाद्या वनस्पतीच्या, रसायनाच्या विशिष्ट वासावरून आपण याच भागात पुन्हा वा परत आलो आहोत, हे ते सांगू शकतात. अंध मुले-मुली ‘सेंटर लेथ’ मशिनवर या ऍल्युमिनियम पाईपची निर्मिती करतात. मुंबई, पुणे, नाशिक, डेहराडून आदी ठिकाणी त्याचे कारखाने आहेत.

पांढऱ्या काठीने चालण्या-वागण्यातली स्वयंपूर्णता अंध बांधवांना दिली. मात्र जगण्यासाठी आथिर्कदृष्ट्या स्वयंपूर्ण होणंही तितकेच महत्त्वाचं असतं. यासाठीच 1995 मध्ये अपंग कायद्यानुसार ज्या प्रमाणे अपंगांना शासकीय नोकर्‍यांमध्ये तीन टक्के आरक्षण जाहीर झाल आहे. त्यात १० टक्के अंधांसाठी आरक्षित आहे. मात्र 'कल्याणकारी' म्हणवून घेणार्‍या शासनाने आतापर्यंत अंधांना वंचीत ठेवले आहे.

पांढर्‍या काठीच्या आधारावर जीवनाशी दिनरात संघर्ष करणार्‍या अंध बांधवांना आज दया किंवा सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे.

वेबदुनिया वर वाचा