महिला मंडळे कशासाठी?

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (14:09 IST)
सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, महर्षि कर्वे यांच्या सारख्या महान समाजसुधारकांमुळे स्त्रिया शिक्षित झाल्या, या गोष्टीलाही आता जवळ-जवळ १५० वर्षे उलटून गेलीत. ज्ञानार्जनासाठी, विद्यार्जनासाठी स्त्रिया घराबाहेर पडू लागल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ लागला. 

करमणूक व विरंगुळा ह्यासाठी चारचौघींनी एकत्र येऊन काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. ह्यातूनच महिला-समाज, महिला-मंडळे, क्लब ह्यांची स्थापना झाली. सुरूवातीला केवळ चैत्रगौर, संक्रांतीचे हळदी कुंकू ह्यासारख्या सणांसाठी महिला एकत्र येऊ लागल्या. शिक्षणामुळे वाचनाची गोडी लागल्याने काही मंडळातर्फे वाचनालय सुरू करण्यात आले.

ललित वाङ्‍मय-कादंबर्‍या, कथा चरित्रे, वैचारिक, अध्यात्मिक पुस्तके स्त्रियांना वाचायला मिळू लागली. ग्रंथांच्या सहवासांत सुशिक्षित स्त्रियांना नवजीवन प्राप्त होऊ लागले. ग्रंथालयांतली ही ज्ञानसंपदा एखाद्या अद्‍भूत जादुगारासारखे मन मोहून टाकू लागली. साहजिकच सुशिक्षित स्त्रियांच्या सहभागाने महिला मंडळांचाही दर्जा सुधारू लागला.

हळूहळू उच्चशिक्षण घेणार्‍या मुलींची संख्या वाढू लागली. स्त्रिया अर्थाजर्नासाठी बाहेर पडू लागल्या. नोकरी निमित्ताने म्हणा किंवा जागेच्या टंचाईमुळे नाईलाजाने विभक्त कुटुंबपद्धती स्वीकारावी लागली. त्यामुळे पाळणाघरांची निकड भासू लागली. काही महिला मंडळांनी पाळणाघरे तथा बालकमंदिरे काढण्याची सुरूवात केली. 

जोपर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण आपल्या सांस्कृतिक जीवनावर पूर्णतः स्वार झाले नव्हते, तोपर्यंत जुने आदर्श जपले गेले होते. त्यांनतर दूरदर्शनवरील अतिरंजित मालिकांचा भडिमार, आत्मकेंद्रित वृत्ती ह्यामुळे जुने आदर्श छिन्नविछिन्न होऊ लागले. बर्थडे, व्हलेंटाईन डे, रोझ डे, मदर्स डे, मॅरेज डे ह्यासारखें आमच्या संस्कृतीत नसलेले खर्चिक समारंभ गाजावाजा करून साजरे केले जाऊ लागले. धर्म, संस्कृती व रूढी ह्यांनी निर्मिलेले आदर्श समाजात पुन्हा समविण्यासाठी महिला मंडळांना सक्रीय होण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

सुशिक्षित पूर्ण वेळ गृहिणी असणार्‍या स्त्रियांसाठी महिला-समाज किंवा महिला मंडळे उपकारक ठरू शकतात. त्यासाठी नानाविध उपक्रम योजना राबविण्यात महिला मंडळांना सहभागी होता येईल. सर्वसामान्य गृहिणींचे गाण्यासारखे छंद एरवी घरात पूर्ण होणं कठीण असतं, पण भजनाच्या माध्यमांतून याच छंदाला एक मार्ग मिळतो. समवयस्क स्त्रियांनी एकत्र येणं ही सर्वसाधारण स्त्रियांची अत्याधिक गरज आहे. 

संपूर्ण आयुष्य स्वतःच्या गरजांना, आवडींना दुय्यम स्थान देत जगलेल्या स्त्रीला एकदम स्वत:च्या गरजांचा, कुटुंबाला वगळून असा प्राधान्याने विचार करतां येत नाही. रोजच्या घरकामाखेरीज स्वतःच्या अंगी असलेल्या इतर कला-कौशल्यांना वाव देणं स्त्रियांना हवसं वाटतं. यांत संवाद-कौशल्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंत अनेक गोष्टी येतात.

स्त्रीच्या सृजनशील मनाला निर्मिर्तित अधिक आनंद मिळतो. संपूर्ण आयुष्य स्वयंपाकघरांत पाककृतींचे वेगवेगळे प्रयोग करूनही किंवा गॅलरीमध्ये फुलझाडे लावूनही तिची ही उर्जा तशीच राहते, अश्याने ती महिला मंडळांचे कालनुपरत्वे चालणारे उपक्रम तिला आकर्षित करू शकतात. 

सामाजिक उपक्रमांबरोबरच, व्यक्तित्त्व विकासांसाठी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी ‍विविध खेळ, स्वसंरक्षणासाठी, ज्युडो-कराटे, योगासने, प्राणायामाच्या वर्ग घेतां येतील. स्त्री जर शारीरिक दृष्टया सामर्थ्यवान नसेल तर तिला काहीच साध्य करता येत नाही. राणी दुर्गावती, झाशीची राणी ह्यांच्यासारखे झुंजार व्यक्तिमत्त्व आपले आदर्श असायलाच हवे. तंदुरूस्त शरीरासाठी बॅडमिंटन, टेबलटेनिस ह्यासारख्या खेळांचे कोर्ट उपलब्ध व्हायला हवे. अर्थात ह्यासाठी महिला मंडळाना स्वत:ची जागा असणे गरजेचे आहे. 

आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी 'बचत गट' योजना, पोषक आहार योजना, प्रौढ-शिक्षण वर्ग, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवता येतील. ग्रामीण भागांतील स्त्रियांनाही स्वत:च्या अस्मितेची जाणीव होऊ लागली आहे. बर्‍याच ठिकाणी गावाच्या सरपंच म्हणून महिला कार्य करताहेत. महिला राजसत्ता आंदोलन, पंचायत समिती ह्या कार्यांमध्ये हिरीरीने भाग घेताहेत. त्यांची ही शक्ती ‍अधिक दृढ करण्यासाठी महिला-मंडळे त्यांना साह्य करू शकतात. 

वर्तमानपत्रांच्या माध्यमांतूनही आकांक्षा, सखीमंच, मधुरांगण ह्यासारखे केवळ महिलांसाठी असलेले क्लब स्थापन झाले आहेत. त्यांना महिलांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्र-सेविका समितीच्या विराट संमेलनांतून मातृशक्तीचे सशक्त रूप सर्वांसमोर प्रकट झाले. सुशीला, सुधीरा व समर्था ही स्त्रीची तीनही रूपें अधिक प्रखरपणे निर्माण होण्यासाठी सर्व महिला-मंडळांनी प्रयत्न करायला हवे, नव्हे आपला खारीएवढा का होईना वाटा उचलायला हवाच.
सौ. स्मिता सतीश मिराशी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती