चारदिवसीय किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास होणार सुरुवात

सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (10:06 IST)
नाशिक शहरात सलग दहाव्या वर्षी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत वसुंधरा स्वच्छता अभियान संस्थेचे अध्यक्ष पर्यावरणप्रेमी अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान तर प्लॅस्टिक बाबत प्रबोधन करणाऱ्या मिलिंद पगारे आणि पर्यावरण विषयाची उत्तम जाण असलेले पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
किर्लोस्कर समूह आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने सर्व नागरिकांना खासकरून युवक व मुलांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे आयोजन देशातील विविध 30 शहरांत वेगवेगळ्या टप्प्यांत करण्यात येते. या महोत्सवाचा विषय 'प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार' असा असणार आहे.
 
येत्या मंगळवारी (दि. 27) रोजी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ एन.टी.पी.एस.(अणू ऊर्जा प्रकल्प), एकलहरे येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. वसुंधरा सन्मान पुरस्कार 2017 विजेते रामदास कोकरे (पर्यावरणप्रेमी व मुख्य अधिकारी - कर्जत नगरपरिषद) यांच्या शुभहस्ते मकरंद देवधर (वरिष्ठ महाव्यवस्थापक, किर्लोस्कर इंजिन ऑईल, नाशिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होईल.
 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट, अनुबोधपट आणि पर्यावरणविषयक अन्य उपक्रम यांनी सजलेला हा भारतातील एकमेव महोत्सव आहे. 'वसुंधरा जगवा , तगवा आणि भावी पिढ्यांसाठी तिचे संवर्धन करा' हा संदेश असलेला हा महोत्सव पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा व पाणी या विषयांना समर्पित आहे. पर्यावरणविषयक जागृती आणि कृती यांची प्रेरणा दृक् - श्राव्य माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे, हे महोत्सवाचे ध्येय आहे.
 
या वर्षी महोत्सवाचा विषय 'प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार' हा असणार आहे. आधुनिक काळाबरोबर विकासाचा परिणाम म्हणून काही समस्या निर्माण झाल्या तर काही दुर्लक्षामुळे. मानवाचं आयुष्य सुकर करण्यासाठी प्लॅस्टिकची निर्मिती झाली, मात्र आज पर्यावरणाला त्याची किंमत मोजावी लागत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर प्लॅस्टिकमुळे जगभरात जमिनीचेच नव्हे तर हवा आणि पाण्याचेही प्रदूषण होत आहे. प्लॅस्टिकचा वापर लक्षणीयरीत्या कमी करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाने या भयानक जागतिक रोगाला या वर्षीचा विषय म्हणून अधोरेखित केले आहे. त्याचधर्तीवर नाशिक शहरात 29 ऑगस्ट रोजी प्लॅस्टिक विरहित दिवस (नो प्लास्टिक डे) पाळण्यात येणार आहे.
 
महोत्सवामध्ये दाखविण्यात येणारे देश - विदेशांतील लघुपट - अनुबोधपट हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहेत. चित्रपटांशिवाय छायाचित्र प्रदर्शन, स्मार्ट वॉक, दृक् - श्राव्य व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा तसेच सन्मान सोहळ्यांनी हा महोत्सव रंगतदार होईल.
 
वसुंधरा हा केवळ उत्सव नसून ही एक चळवळ आहे. आपल्या लोकशाहीतली ध्येयधोरणे ठरविणाऱ्यांना प्रमावित करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे. वसुंधरेच्या सद्यस्थितीबाबत लोकांना सजग करावं आणि आपला समृध्द नैसर्गिक ठेवा अधिक समजुन घ्यावा, ही यामागची भूमिका आहे. या महोत्सवाचा आपण सर्वांनी भरभरुन आनंद घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी केले आहे.
 
असा असणार किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव :
* पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा, व पाणी या विषयांना समर्पित महोत्सवाचे सलग दहावे वर्ष
* 'प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार' असा या वर्षीचा विषय
* वसुंधरा स्वच्छता अभियान संस्थेचे अध्यक्ष पर्यावरणप्रेमी अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान
* प्लॅस्टिक बाबत प्रबोधन करणाऱ्या मिलिंद पगारे आणि पर्यावरण विषयाची उत्तम जाण असलेले पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्कार
* ४५ हून अधिक लघुपट आणि अनुबोधपट यांचे महाविद्यालये शाळांत दाखवणार
* व्याख्याने, फोटो प्रदर्शन, चर्चासत्र, वर्कशॉप, प्लॅस्टिक प्रदूषण उपाय या विषयावर वर्कशॉप, * हसत खेळत पर्यावरण उपक्रम, एकलहरे अणुउर्जा वीज प्रकल्पातील पर्यावरण विषयक उपक्रमास भेट
* किर्लाेस्कर वसुंधरा इको रेंजर्स संकल्पनेची व्याप्ती 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती