गुरू ग्रहाच्या वलयांचे रहस्य उलगडले

गुरूवार, 15 मार्च 2018 (15:21 IST)
सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूवर वाहणार्‍या वेगवान वार्‍यांबाबत शास्त्रज्ञांना नवी माहिती मिळाली आहे. गुरूवर ढगांच्या 1800 मैलखोलवर जबरदस्त चक्रिवादळे वाहत असतात, असे एका ताज्या संशोधनातून शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गुरूवर दिसणार्‍या पट्टेदार वलयांचे कारणही त्यातच दडलेले आहे. या ग्रहावर घोंगावत असलेल्या हायड्रोजन आणि हेलियम वायूच्या विशाल गोळ्यांमुळे या ग्रहावरील हवेमध्ये परिवर्तन होते आणि तेच या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये होणार्‍या बदलांचेही कारण असते. त्यामुळेच ग्रहाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमध्ये असंतुलनाची स्थितीही तयार होत असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, गुरूच्या सर्व ध्रुवावर अनेक मैल रुंद चक्रीवादळे घोंगावतात. ही चक्रीवादळे बहुभुजी वादळांनीही घेरलेली असतात, असेही या अध्ययनात दिसून आले. उत्तरेला त्यांची संख्या आठ आहे, तर दक्षिणेला पाच आहे. नासाच्या विशेषज्ञांनी या तथ्यांचे आकलन केले. त्यांनी सांगितले की, गुरूच्या पृष्ठभागावर हवा उलट दिशेने वाहते. यादरम्यान तिचा वेग प्रतिसेकंद शंभर मीटर असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती