बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या राजकारणाचा बळी ठरला का?

शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (19:10 IST)
समी चौधरी
 बऱ्याचदा लोक आपल्याला आलेल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडतात. अगदी तशीच परंपरा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मध्ये दिसून येते. आणि एवढ्यावरच न थांबता खेळाडूंची बडतर्फी आणि राजीनामा घेऊन व्यवस्थेच्या अपयशावर उपाय शोधला जातो.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्वतः एडहॉक (तात्पुरत्या) तत्त्वावर आपलं अस्तित्व राखून असताना क्रिकेट संघाबाबत मात्र दीर्घकालीन निर्णय घेत आहे.
 
जसं की, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या अपयशाचा ठपका कर्णधारावर टाकून क्रिकेट बोर्डाने आपल्या जबाबदारीपासून हात झटकून टाकले आहेत.
 
चार वर्षं राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केल्यानंतर बाबर आझमने अखेर कर्णधार पदाचा राजीनामा दिला असून त्याच्या जागी नवं नेतृत्व देण्यात आलं आहे.
 
बाबरच्या चार वर्षांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे टी-20 फॉरमॅटमध्ये तो सर्फराज अहमदनंतर पाकिस्तानचा दुसरा सर्वांत यशस्वी कर्णधार आहे.
 
त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक विजय मिळवले आहेत.
 
बाबर आझमचे संस्मरणीय क्षण
2021 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला होता. आयसीसी स्पर्धांच्या 46 वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानने पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताला जागतिक स्पर्धेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
त्यानंतर एका वर्षाने, बाबर आझमच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात संघाने चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत पाकिस्तानी संघ अंतिम फेरीत पोहोचला. संघासमोर इंग्लंडचं आव्हान असताना पाकिस्तान स्पर्धेचा उपविजेता ठरला.
 
या अंतिम सामन्यातही पाकिस्तान विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र शाहीन शाह आफ्रिदीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला शेवटची दोन षटकं टाकता आली नाहीत. त्यामुळे संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं.
 
पण क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये बाबर आझमची कामगिरी अजूनही कायम होती.
 
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला एकापाठोपाठ एक पराभूत करून त्याने पाकिस्तानला आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नेलं.
 
मात्र, बाबर आझमला कसोटी क्रिकेटमध्ये या कामगिरीत सातत्य ठेवता आलं नाही.
 
त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदाच होम सिरिजध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप केला. तर अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर असताना 'द पाकिस्तान वे'प्रमाणे आक्रमक खेळी करत आणखी एक क्लीन स्वीप नोंदवला.
 
बाबर आझम कोणतंही मोठं जेतेपद मिळवू शकला नाही
पण नाण्याची दुसरी बाजू सांगायची तर पाकिस्तानने बाबर आझमच्या नेतृत्वात तीन आशिया कप, दोन टी-20 विश्वचषक आणि अलीकडचा एकदिवसीय विश्वचषक खेळला. यात पाकिस्तान संघाची कामगिरी सुमार होती.
 
दबाव असेल तर बाबर आझमला खेळता येत नाही आणि निर्णय घेताना तो बारीक सारीक चुका करतो अशी टीका त्याच्यावर केली जाते.
 
जेव्हा मागची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू होती तेव्हा पाकिस्तानी संघ अंतिम फेरी गाठेल, असं म्हटलं जात होतं.
 
घरच्या मैदानापासून दूर असलेल्या पाकिस्तानी संघासमोर बांगलादेश आणि श्रीलंकासारखे सोपे प्रतिस्पर्धी होते. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या संघांना तोंड देण्याचा फायदा होणार होता.
 
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना जिंकून दोन दशकं उलटली आहेत. घरच्या मैदानावर पाकिस्तान ऑस्ट्रेलियासाठी आव्हान उभं करेल, अशी अपेक्षा होती.
 
मात्र महत्त्वाच्या प्रसंगी बाबर आझमचे नेतृत्व कौशल्य अपयशी ठरले आणि बचावात्मक शैलीमुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली.
 
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात आला तेव्हा बाबर आझमच्या नेतृत्व क्षमतेची पुन्हा एकदा कसोटी लागली आणि इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला घरच्या मैदानावर क्लीन स्वीपचा अपमान सहन करावा लागला.
 
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभवापासून वाचवण्यात यश तर आलं, पण त्याचवेळी चॅम्पियनशिपच्या या सायकलमध्ये पाकिस्तानला घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकण्यात यश आलेलं नाही.
 
त्याचप्रमाणे सात टी-20 सामन्यांची लांबलचक मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात आला तेव्हा बाबर आझमला ना संघाची नीट निवड करता आली, ना त्याला ही मालिका जिंकता आली. त्याच्या नेतृत्व क्षमतेत त्रुटी होत्या.
 
आणि नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानचा संघ पाच सामने हरला.
 
चार वर्षांत बदलले चार प्रमुख आणि तीन मुख्य प्रशिक्षक
पण या चार वर्षांच्या कालावधीत बाबर आझमला चार वेगवेगळ्या पीसीबी प्रमुखांबरोबर ताळमेळ बसवावा लागला. एवढंच नाही तर कोचिंग सेटअपमध्ये बरेच बदल झाले आणि बदललेल्या तीन मुख्य प्रशिक्षकांसोबत देखील जमवून घ्यावं लागलं.
 
2019 मध्ये अहसान मणी यांनी मिसबाह उल हककडे कोचिंगची जबाबदारी सोपवली होती. त्याला पुढील दहा वर्षांसाठी संघ तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं.
 
दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर बाबरच्या नेतृत्वाखाली संघाने कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप दिला तर एक दिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
 
पण नंतर रमीझ राजा अध्यक्ष झाले आणि त्यांच्या वारंवार बदलणार्‍या स्वभावामुळे कोचिंग सेटअपमध्ये बदल झाले, खेळपट्ट्यांचं नूतनीकरण आणि निवडीचे नवे प्रयोग सुरू झाले. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या अपयशाची नवी मालिका सुरू झाली.
 
आज बाबर आझमच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि काही महत्त्वाच्या प्रसंगी त्याचे मैदानावरील निर्णयही पाकिस्तान संघाला महागात पडलेत यात काही शंका नाही.
 
पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या प्रमुखांचे आणि त्यांना नियुक्त करणाऱ्या पंतप्रधानांचे निर्णय बाबरच्या तुलनेत खूपच महागात पडले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र या निर्णयांची किंमत बाबरला मोजावी लागली एवढं मात्र खरं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती