IND VS SA : टीम इंडियाचा दिवाळी बंपर, दक्षिण आफ्रिकेला रांची कसोटी सामन्यात 202 धावा आणि एका डावाने पराभूत केले

मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (10:35 IST)
रांची – सध्या भारतीयांची दिवाळी सणाची तयारी सुरू आहे. मात्र, या दिवाळीच्या आधीच टीम इंडियाने देशाला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आज चौथ्या दिवशी आफ्रिकेवर 202 धावांनी विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने आफ्रिकेला ‘व्हाइटवॉश’ दिला. भारताने ही मालिका ३-० ने जिंकली आहे. 
 
दरम्यान, या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आणि ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
 
सलामीवीर डीन एल्गरला चेंडू लागल्याने तो १६ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत आजचा पराभव उद्यावर ढकलला. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटांमध्येच खेळ संपला. डे ब्रून (३०) आणि लुंगी एन्गीडी नदीमच्या सलग दोन चेंडूवर बाद झाले. मोहम्मद शमीने ३, उमेश यादव आणि शाहबाज नदीम २-२, तर जाडेजा व अश्विनने १-१ बळी टिपला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती