अखेर पाकिस्तान सुपर लीगही स्थगित

बुधवार, 18 मार्च 2020 (16:06 IST)
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे भारतातील आघाडीची टी20 आयपीएल स्पर्धा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या क्रिकेट आणि इतर क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. असे असताना पाकिस्तान सुपर लीग टी-20 स्पर्धा मात्र बिनदिक्कत खेळवण्यात येत होती, पण अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेची साखळी फेरी पूर्ण झाली होती. साखळी फेरीतून मुलतान टायगर्स, पेशावर झल्मी, लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स हे चार संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले होते. 17 मार्चला या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीच्या लढती खेळवल्या जाणार होत्या, तर अंतिम सामना 18 मार्चला होणार होता. पण या स्पर्धेत खेळत असलेले काही महत्त्वाचे परदेशी खेळाडू यांनी कोरोनाच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून स्पर्धेतून काढता पाय घेतला. त्यामुळे अखेर या स्पर्धेच्या बाद फेरीचे सामने नंतर खेळवण्यात येतील, असा निर्णय घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा तात्पुरती स्थगित केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती