बहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’चा ट्रेलर प्रदर्शित

बुधवार, 27 मार्च 2019 (11:48 IST)
‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.
 
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आज प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने हा एक भरपूर मनोरंजनाने भरलेला चित्रपट असेल, याची खूणगाठच बांधली गेली आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी असा हा एकूण मामला असेल, हे ट्रेलर पाहताक्षणी पटते आणि चित्रपटाची प्रतीक्षा आणखीनच वाढते.
 
पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्रीवेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.
 
मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे हे आघाडीचे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी या चित्रपटातून प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ मधील डॉ. सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘वेडिंगचा शिनेमाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.
वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना,तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती