"ही जाणीवपूर्वक बदनामी'" अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वकिलाचा खुलासा

सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (11:13 IST)
फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी समन्स बजावूनही ठाणे न्यायालयासमोर हजर न राहिल्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट बजावले असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते. यावर प्राजक्ता माळी यांचे वकील प्रताप परदेशी यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. 
 
माझी अशिल प्राजक्ता माळीविरूद्ध खोटी खाजगी फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचे ते सांगतात. याबाबतचे समन्स आम्हाला कधीही मिळालेले नाहीत. जुलै महिन्यातच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने या केसला स्थगिती दिली आहे. मात्र, फिर्यादी आणि त्याच्या वकिलांनी एका खासगी वृत्तवाहिनीला खोटी माहिती देऊन प्राजक्ता माळी यांची जाणीवपूर्वक बदनामी केली असल्याचे स्पष्टीकरण वकील प्रताप परदेशी यांनी दिले आहे.
 
परदेशी पुढे म्हणाले, ''सत्र न्यायालयात आव्हान दिल्यामुळे कनिष्ट न्यायालय पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही गोष्ट करु शकत नाही; परंतु या आधी समन्स बजावले नसतानाही खोटी माहिती देऊन आमच्या अशिलाची माध्यमातून बदनामी केली जात आहे." 
 
सध्या सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने प्राजक्ता माळी याविषयी कोणतेही भाष्य करू शकत नाहीत. मात्र, निकालानंतर बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परदेशी यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती