'पंचक'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (13:44 IST)
काही दिवसांपूर्वीच 'पंचक'चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. घरात पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर' या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'आता कोणाचा नंबर?' हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' चित्रपटातील हे कोडे येत्या नवीन वर्षात म्हणजेच 5 जानेवारीला सुटणार आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्माते आहेत तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. 
 
 आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहाण्याची संधी 'पंचक'च्या निमित्ताने मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे. पोस्टरमध्ये प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत असतानाच आदिनाथ कोठारे मात्र दोन्ही हात कानावर ठेवून ही सर्कस थांबवू पाहतोय. त्यामुळे आता आदिनाथच्या ऑपेरापुढे ही सर्कस नमते घेणार का? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक जयंत जठार, राहुल आवटे म्हणतात, '' हा चित्रपट म्हणजे सिच्युएशनल आणि ब्लॅक कॉमेडी आहे. आपल्या आजूबाजूचा विषय, ज्याचे गांभीर्य जाऊ न देता अतिशय मजेशीर पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे., टिझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी टीझरबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्याच कलाकारांचा अभिनय अतिशय दर्जेदार आहे. त्यांच्या अभिनयाने यात अधिक रंगत आणली आहे. खोतांच्या घरात लागलेल्या या पंचकात आता कोणाचा नंबर लागणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती