'रेडू'चा गमतीदार ट्रेलर लाँच

शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (15:32 IST)
मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला 'रेट्रो' काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने 'रेडू' हा सिनेमा, येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी - मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर केला गेला असल्याचे पाहायला मिळते. रेडूच्या माध्यमातून सामान्य माणसाचे भावविश्व या सिनेमात मांडण्यात आले आहे.
रेडूवर अमाप प्रेम करणाऱ्या प्रमुख पात्राची भूमिका यात शशांक शेंडे यांनी वठवली असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची अनोखी झलकदेखील या सिनेमाच्या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. जिवापाड जपलेला हा रेडू जेव्हा हरवतो, तेव्हा काय होते? अखेर तो सापडतो का? हे सारे काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच 'रेडू' विषयी ग्रामस्थांमध्ये असणारे कुतूहल आणि त्यामुळे उद्भवणारे गमतीदार प्रसंग यात दिसून येत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे यांच्या लेखणीतून सादर झालेल्या या मालवणी भाषेतील सिनेमाचे मंगेश गाडेकर यांनी छायाचित्रण केले आहे.
 

शशांक शेंडे बरोबरच छाया कदम ही ताकदीची अभिनेत्रीदेखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती