मयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार'ची मानकरी

शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (14:11 IST)
'डिअर आजो' साठी 'सर्वोत्कृष्ट लेखन' आणि 'अभिनेत्री'चा पुरस्कार 
 
आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो'. हेमंत आपटे निर्मित, अजित भुरे दिग्दर्शित या नाटकात संजय मोने आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली आहे. अतिशय परिपक्व संहिता असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, याव्यतिरिक्त या नाटकाने नुकताच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला 'माझा पुरस्कार'ही पटकावला. या नाटकासाठी मयुरीला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' आणि 'सर्वोत्कृष्ट लेखिका' या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याशिवाय 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कारासाठी नाटकातील स्त्री विभागात मयुरीला नामांकन मिळाले आहे. थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलेल्या मयुरीने पाच वर्षांपूर्वीच हे नाटक लिहिले होते. लिखाणाच्या प्रयत्नाने लिहिलेली तिची ही कथा अनेक दिग्गजांना आवडली. इतक्या लहान वयात केलेल्या तिच्या प्रगल्भ लेखनाचे कौतुकही झाले. अजित भुरे यांना ही कथा तेव्हाच भावली असल्याने, त्यांनी या नाटकाचे दिग्दर्शन कारण्याचे ठरवले आणि 'डिअर आजो' प्रेक्षकांच्या भेटीला आले. अभिनय हे मयुरीचे पहिले प्रेम आहेच. परंतु आपल्या लिखाणाच्या आवडीबद्दल मयुरी म्हणते, ''मी थिएटर आर्ट्सला असताना शफात खान आम्हाला नाट्यलेखन शिकवायचे आणि नाट्यलेखन मला खूप मजेशीर वाटले. काहीतरी आव्हानात्मक वाटले म्हणून मी लिखाणाला सुरुवात केली. माझ्या लिखाणाला अजित भुरे आणि संजय मोने अशा दिग्गजांकडून दाद मिळाली. मुळात माझ्या वयाकडे बघून अनेकांना विश्वास बसत नाही, की हिने काही प्रगल्भ लिहिले असेल. असे असतानाही अजित भुरे आणि संजय मोने यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी कथा प्रेक्षकांसमोर आणली. त्यामुळे या नाटकाला आज जे यश मिळतेय, त्याचे श्रेय त्यांनाही तितकेच जाते.''

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती