अशी रंगली 'बोगदा' सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत

शनिवार, 28 जुलै 2018 (12:55 IST)
सिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्टपद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक प्रतिकूल परीस्ठीतीतून त्यांना मार्ग काढावे लागतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शीत 'बोगदा' या सिनेमाच्या चीत्रीकरणादरम्यान असाच एक किस्सा समोर आला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. त्यादरम्यानच्या एका सीनसाठी पडद्यामागील कलाकारांची मेहनत खूप कामी आली. तो सीन म्हणजे, वेंगुर्ला गावातील एका जुन्या मंदिराच्या तलावात मृण्मयीला नृत्य करायचे होते. परंतु, हे मंदिर खुप जीर्ण आणि निर्मनुष्य असल्याकारणामुळे, पाण्यात उतरण्यासारखी या तलावाची अवस्था नव्हती. शिवाय, शेवाळी आणि मातीचा तवंग साठलेल्या या तलावात विषारी सापांचे वास्त्यव्यदेखील होते. 'बोगदा' सिनेमाच्या कथानकासाठी, या तलावात चित्रीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याकारणामुळे या तलावातील पाणी पूर्णतः स्वच्छ करण्याचे अभियान तिथे सर्वप्रथम राबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करताना 'बोगदा' सिनेमाचे छायाचित्रकार प्रदीप विघ्नवेळू यांनी स्वतः पाण्यात उतरत तलावाची पाहणी केली. सापाचा कोणताही धोका नसल्याची खात्री बाळगत त्यांनी मृण्मयीला पाण्यात उतरण्यास सांगितले. मृण्मयीनेदेखील मनात कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता, तलावातील आपला सीन वन टेक पूर्ण केला. 
 
येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा नुकताच ७५ व्या वेनिस अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतिम निवडप्रक्रीयेपर्यंत पोहोचला होता. जागतिक पातळीवरील दर्जेदार दिग्दर्शकांच्या आणि चित्रपटांच्या सन्मानप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवामध्ये 'बोगदा' सिनेमाने भारतातील सर्वोत्कुष्ट प्रादेशिक सिनेमांच्या निवडप्रक्रियेत इतर चित्रपटांना चुरशीची लढत दिली होती. शिवाय, याबाबत वेनिस अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी मेंबरकडूनदेखील 'बोगदा' सिनेमा प्रशंसनीय असल्याचे सांगण्यात आले आहे. या सिनेमाचे लेखन, पटकथा आणि संवाद, दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच लिहिली असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा  पानमंद या तिकडींसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती