ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (13:24 IST)
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान यांनी नुकत्याच एका खास कारणास्तव मुंबईत हजेरी लावली होती. हे खास कारण म्हणजे, 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा ! मुंबईतील प्रशस्त ताज लॅन्डस् अँड हॉटेलमध्ये दिमाखात पार पडलेला हा संगीतसोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ए.आर. रेहमान यांच्या आगमनाने ऐतिहासिक ठरला. 
 
'माझा अगडबम' सिनेमाचे संगीतदिग्दर्शक तसेच निर्माते टी.सतीश चक्रवर्ती यांना शुभेच्छा देण्यासाठी ए.आर. रेहमान यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. त्यामुळे, या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांना ए.आर. रेहमान आणि टी.सतीश चक्रवर्ती यांच्यातील गुरु-शिष्य नात्याची प्रेरणादायी अनुभूती घेता आली. तसेच, महाराष्ट्राची लाडकी नाजुका आणि ए.आर. रेहमान यांची झालेली ग्रेटभेटदेखील रंजक ठरली.   
तृप्ती भोईर लिखित आणि दिग्दर्शित 'माझा अगडबम' सिनेमाच्या या म्युजिक लॉंच कार्यक्रमात भाजपा प्रवक्त्या शायना एन.सी. यांची देखील खास उपस्थिती लाभली. ए.आर. रेहमान यांच्या सांगितीक तालमीत तयार झालेले टी. सतीश चक्रवर्ती यांनी ए.आर. रेहमान यांच्या सुप्रसिद्ध तामिळ गाण्याचे मराठीत सादरीकरण करत, त्यांचे अनोखे स्वागत केले. शिवाय त्यांच्यासोबत केलेल्या कामाच्या काही गोड आठवणीदेखील त्यांनी लोकांसमवेत शेअर केल्या. ए.आर. रेहमान यांनी देखील  टी. सतीश चक्रवर्ती यांचे कौतुक करत, मला मराठी संस्कृती आणि भाषा आवडत असल्याच सांगितलं. त्यामुळे जेव्हा सतीश मराठीत एक मोठा प्रोजेक्ट करतो असं कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. असंदेखील ते पुढे म्हणाले. 

दरम्यान, 'प्रीती सुमने' या रॉमेंटिक गाण्याचा उपस्थितांनी आस्वाद लुटला. तसेच, आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं 'माझा अगडबम' सिनेमातील 'हळुवारा हलके' हे भावनिक गाणंदेखील यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. हिंदीची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या दर्दी आवाजात सादर झालेले हे गाणे, प्रेक्षकांना भाऊक करून जातं. मंगेश कांगणे लिखित या गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांनी चाल दिली असून, सिनेमातील नाजूका या प्रमुख व्यक्तिरेखेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. 'हळुवारा हलके' या गाण्यालादेखील प्रेक्षक सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे चांगला प्रतिसाद देतील, असं हे गाणं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती