स्वप्नील- अमृता, सिद्धार्थ- मधुरा ‘जिवलगा’ मधून छोट्या पडद्यावर (बघा फोटो, व्हिडिओ)

मुंबई: नवनवीन मालिका आणि त्यांचं दर्जेदार सादरीकरण याच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. असाच एक वेगळा विषय असलेली मालिका ‘जिवलगा’ लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या जगतात एक महत्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे. आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी दुरचित्रवाणीवर दिसणार आहेत. तर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येईल.

 
 
सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा...ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा...,”अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. “स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयाने आणि ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.
स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, “मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.
 
या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘स्टार प्रवाह’सारख्या नावाजलेल्या वाहिनीवर ही मालिका येतेय याचा मला विशेष आनंद आहे.”
‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.
 
“जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. भाषिक दूरचित्रवाहिनीवर अशा प्रकारचे भव्यदिव्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ या माध्यमातून सुपरस्टार कलाकार आणि उत्तम कथा असे एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. ही एक उत्तम अशी कथा असून त्यात व्यक्तिरेखांची मानवी कड अनुभवायला मिळेल असे स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले.
 
मधुरा देशपांडे म्हणते, “जिवलगा मालिकेची कथा ऐकूनच मी कथानकाच्या प्रेमात पडले. माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. मी साकारत असलेली विधी ही व्यक्तिरेखा खूप प्रेमळ, ‘हॅप्पी गो लकी’ अशी मुलगी आहे. तिचा प्रेमावर खूप विश्वास आहे आणि ती सर्वांना प्रेमाने जिंकत असते. करीयरच्या सुरुवातीला मी ‘स्टार प्रवाह’बरोबर काम केलं होतं. प्रवाहसोबत ही माझी तिसरी मालिका आहे, त्यामुळे ही मालिका करताना मला अधिक सोप्प गेलं.”
 
अमृता खानविलकर म्हणाली, ही मलिका कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. कोणतंही काम जेव्हा मी पहिल्यांदा करते तेव्हा मी खूप उत्साही असते. याआधी मी कधीच टीव्ही मालिका केलेल्या नाहीत. माझ्यासाठी सर्वात मह्त्वाचं असतं ते म्हणजे भूमिका. मग वेब सिरीज असोत, मराठी-हिंदी चित्रपट असोत किंवा रिऍलिटी शो. ‘जिवलगा’मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जितकी मजा मला ही भूमिका साकारताना येतेय तितकीच ती तुम्हाला बघताना येईल.”
 
“मी तब्बल नऊ वर्षानंतर टीव्हीवर प्रवेश करतोय. आतापर्यंत मी ‘स्टार प्रवाह’बरोबर मालिका केलेल्या आहेत. माझी पहिली मालिका ‘अग्नीहोत्र’चे दिग्दर्शनही सतीश राजवाडे यांनीचे केले होते. या मालिकेचा विषय मला खूप नवीन वाटला आणि त्याचमुळे मी लगेच तयार झालो. ही एक वेगळी कथा आहे आणि तिची सुरुवात आणि शेवट मला माहित आहे. हा एक चित्रपट किंवा नाटक असतं, तरी मी या प्रोजेक्टवर काम नक्की केलं असतं. मी यात निखिल या थोड्या प्रॉब्लेममध्ये अडकलेल्या आणि मनात सगळ्या गोष्टी साठवून ठेवणाऱ्या युवकाचा रोल करतो आहे. त्याच्या संघर्षाचा हा प्रवास आहे,” असं सिद्धार्थ चांदेकर म्हणतो.
 
‘स्टार प्रवाह’ने आपल्या स्थापनेपासूनच दर्जेदार मराठी मालिका आणि कार्यक्रम देण्यावर भर ठेवला आहे. ‘जिवलगा’ ही मालिकाही आपलं वेगळेपण नक्कीच अधोरेखित करेल. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. तेव्हा पाहायला विसरु नका ‘जिवलगा’ ८ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती