‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाला जगभरातून उदंड प्रतिसाद

मंगळवार, 15 डिसेंबर 2015 (12:40 IST)
•    प्रेक्षकांसाठी खुलणार जगभरातील आंतरराष्ट्रीय लघुपटांचा खजाना
•    भारतातील इतर राज्यांसोबत तब्बल १५ हून अधिक देशांचा सहभाग
 
आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या वर्तुळात प्रसिध्द असलेला ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’ येत्या १६ डिसेंबर पासून मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात साजरा होणार आहे. युनिव्हर्सल मराठी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानाने होणा-या या महोत्सवात जगभरातील लघुपटकारानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. तीन दिवसीय होणा-या या महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी बुक एक्झिबिशन, पॅनल डिस्कशन, सेलिब्रीटी मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
 
देशाच्या कानाकोप-यातून त्याचबरोबर अमेरिका, इंग्लंड, रशिया, इटली, इराण, बांग्लादेश, पाकिस्तान, क्रोटीआ, सिंगापूर, ग्रीस, थायलंड, पोर्तुगल या देशांनी यावर्षीच्या महोत्सवात सहभाग घेतला आहे. सहभागी लघुपटांची एकूण संख्या ६०० पेक्षा जास्त आहे. त्यात विशेष म्हणजे १५ वर्षाच्या नवोदितापासून ते ६५ वर्षाच्या अनुभवी लघुपटकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवासाठी सोशल अवेरनेस, इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स, अॅड फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स, म्युझिक विडीओ, डॉक्युमेंटरी आणि मोबाईल शूट फिल्म्स अश्या एकूण सात वर्गवारी करण्यात आल्या आहेत. गतवर्षी पेक्षा यावर्षी मोबाईल शूट फिल्म या वर्गवारीत आणि महिला लघुपट कारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
 
महोत्सवात प्रदर्शित होणा-या लघुपट नामांकने (स्क्रीनिंग लिस्ट) १२ डिसेंबर पासून वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर टीव्ही माध्यमातील लघुपट प्रक्षेपणात पायोनियर ठरलेल्या “शॉर्ट फिल्म शोकेस” या कार्यक्रमाने तृतीय वर्षात पदार्पण करत शंभरहून अधिक एपिसोड साजरे केले आहेत. त्यामध्ये जवळपास ३५० हून अधिक लघुपट प्रदर्शित झाले आहेत. या १०० व्या एपिसोडचं औचित्य साधून महोत्सवात लघुपटकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
 
१६ ते १८ डिसेंबर दरम्यान होणा-या या महोत्सवाला सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. १७ तारखेला संध्याकाळी ४ वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, फिल्म मेकर नीलकांती पाटेकर, दिग्दर्शक अभिनेते विजू माने, निर्माते अनंत पणशीकर यांच्या उपस्थितीत 'शोर्ट फिल्मस… लॉंग वे टू गो' या विषयावर पॅनल डिस्कशन (panel discussion) होणार आहे.
 
त्याचबरोबर आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचे पणतू सुरेंद्र शंकरशेठ यांची उपस्थिती महोत्सवाला असणार आहे. यावेळी त्यंच्यावर बनवलेल्या माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंगही होणार आहे. १८ डिसेंबरला संध्याकाळी पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना रोख रखमेसहित सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. या महोत्सवाला सर्वाना विनामूल्य प्रवेश असेल पण त्यासाठी www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर नाव नोंदणी करण्याची आवश्यकता आहे.  अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा