जेट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

शुक्रवार, 3 मे 2019 (09:59 IST)
जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स ॲण्ड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर जेट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी पुढे आले. जेट एअरवेज कंपनी बंद झाल्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ येथून हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थित काल लाँग मार्च काढण्यात आला.
 
जेट कामगारांच्या हक्कासाठी जेटचे चेअरमन, डायरेक्टर आणि मॅनेजमेंट यांच्यावर एफआयआर दाखल करून ते परागंदा होऊ नयेत यासाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करावे या मागणीसाठी आमदार किरण पावसकर यांनी हजारो कर्मचाऱ्यांच्या सोबतीने सहार पोलिस स्टेशनला थेट धडक दिली.
 
यावेळी आमदार किरण पावसकर  मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आणि जेट कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्व सत्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिस आयुक्तांनी आमदार किरण पावसकर यांना जेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबत पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती