संक्रांत निमित्त - कथुली

संक्रांतीला दिवसही कणाकणानी मोठा व्हाला सुरूवात होते. सकाळी सकाळी वाजणारी बोचरी थंडी मध्यान्हीच्या उन्हात बोथट व्हायला लागली आणि पतंगांच्या मोसमाला सुरवात झाली.

निरभ्र आकाशात रंगीबेरंगी पतंगाच्या आकृत्या उमटायला लागल्या. सारेच सरसावून गच्चीवर, मैदानात जमायला लागले. नवीन काचेरी मांजा, नवीन चकर्‍या आणि नवनवीन आकाराचे पतंग बाजारात दिसू लागले. बघावे तिकडे पतंगाची फर...फर, पतंग उडवणार्‍यांचा जल्लोष नि कल्लोळ. समोरसमोरच गच्चीतून दोन पतंगाची अगदी चढाओढ लागली. एक पतंग कटला आणि त्यातला दुसरा शांतपणे आकाशात उडत राहिला. कटलेला पतंग आनंदात बेहोशीत दुसर्‍या पतंगाला म्हणाला, ‘बघ! आज मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे. मी आज मनसोक्त वाटेल तसा आकाशात उडू शकतो. ना मला दोर्‍याचे बंधन ना चक्रीशी बांधिलकी. मी आज मुक्त आहे! मुक्त आहे!’ असे गातच तो बेहोशीत बेधूंद होऊन जणू वार्‍याशीस स्पर्धा करत गिरक्या घेत उडत राहिला. शांतपणे उडणारा पतंग तला म्हणाला, ‘अरे! सावर स्वत:ला. स्वातंत्र्य मिळालं म्हणून असा स्वैर उडू नकोस. शांतपणे स्वत:ला सावरून उडत राहिलास तर कुणाच तरी गच्चीत, किंवा अंगणात सुखरूपपणे पोहचशील.’ आपल्याच नादात उडणार्‍या त्या पतंगाला त्याचे हे उपदेशाचे डोस नको होते. 

स्वातंत्रचा आनंद लुटता लुटताच तो गिरक्या घेत घेत बेछूटपणे उडत राहिला. क्षणार्धात वार्‍याचा एक झोत आला नि कटलेला पतंग लांब लांब दूरवरफेकला गेला. गिरक्या घेतच भेलांडत भेलांडत बाभळीच्या झाडात अडकून बसला. असंख्य काटय़ांनी त्याचे अंग विदीर्ण विदीर्ण होऊन गेले. कटलेला पतंग पकडण्यासाठी अनेकजण झेलगुंडा टाकत राहिले, दगड मारत राहिले. विदीर्ण झालेला पतंग आणखीनच विदीर्ण होऊन चिंध्या होऊन झाडाला लोंबकळत राहिला.
रेखा शाह

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती