राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (16:08 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत देखील देण्यात आली. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला १४५ आमदारांचा पाठिंबा असल्यचा दावा राज्यपालांसमोर सिद्ध करता यायला हवे. राष्ट्रवादीला राज्यपालांकडे आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या जलद गतीने घडामोडी घडत आहेत.
 
सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियमानुसार सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजप पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून भाजपला ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. भाजप आणि शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले. अखेर शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला अपयश आले आणि भाजपने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेतली. राज्यपालांनी राज्यातील सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणजे शिवसेना पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून २४ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र, २४ तासांत शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. राज्यपालांनी नियमानुसार थर्ड लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती