अशी आहे 'मर्‍हाटी' संस्कृती

शुक्रवार, 1 मे 2020 (07:36 IST)
महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बिबी का मकबरा येथे पाहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक गड, किल्ले व दुर्ग आहेत. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग अशी काही महत्त्वपूर्ण नावे सांगता येतील.

महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारूड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीचे रचयिते) यांच्यापासून सुरू होणारी ही परंपरा प्र.के. अत्रे, व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे आदी  साहित्यिकांनी समृद्ध केली आहे. दरवर्षी हजारो मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणीचे प्रमुख केंद्र मुंबई हेच आहे आणि बहुतेक मारठी कलाकार या सर्व माध्यमांतून काम करतात. बाबूराव पेंटर, बाबूराव पेंढारकर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्यापासून आजच्या सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला मोलाचे योगदान दिले आहे. 

मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खालिडकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी प्रभृतींनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवरा भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनाथ मंगेशकर या महान कलाकारांनी रंगभूमीची अविरत सेवा केली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसह अनेक खाजगी उपग्रह वाहिन्या आज 247 कार्यरत आहेत. राज्यातीलच नव्हे परदेशांतील मराठी भाषिकांनाही त्यांचा आस्वाद घेता येऊ लागला आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, बाजरी आणि ज्वारी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापले जातात. सामिष अन्नही आवडीने खाल्ले जाते. 

मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरूषांचा धोतर, पायजमा आणि सदरा असा आहे. शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ इथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ बालकांचे आवडते आहेत. दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यापैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे. त्याचबरोबर शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा व दिवाळी इत्यादी सणही साजरे केले जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती