ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला

विसापूर किल्ला Visapur Fort – ३०३८ फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.
 
इतिहास : मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता.
 
मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापूर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च१८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
 
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबावर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे.
 
गडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
 
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
 
२) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
 
३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापुरला जाण्याचा रस्ता आहे.
 
गडावर राहण्यासाठी दोन गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत. गडावर जाण्यासाठी अडीच तास लागतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती