मेळघाटचे पावसाळी वनवैभव

सोमवार, 15 जुलै 2019 (13:00 IST)
परतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची हिरवीगार शेते पिकांनी डोलू लागली होती. आदिवासी बांधव शेतीच्या कामात गुंतली होती. दर्‍याखोर्‍याच्या मेळघाटातील पर्वतराजीने क्षितीजापर्यंत हिरवी शाल पांघरली होती. त्यावर पांढर्‍याशुभ्र पुजक्यांचे ढग लडिवाळपणे खेळताना दिसत होते. नभात कृष्ण मेघांची दाटी झाली होती. रानवार्‍याने त्यांच्याशी हातमिळवणी केली. आणि आषाढधारा बरसू लागल्या. वृक्ष-लता चिंब भिजू लागल्या. त्यांच्या पानापानावरुन पाणी जमिनीवर पडू लागले. त्याचे ओहळ तयार होऊन ते नदी नाल्यात जाऊ लागले होते. त्यामुळे नदी नाले भरभरून वाहू लागली होती. 
 
मेळघाटच्या डोंगरवनातील धबधबे काळ्या शिळांवरुन कोसळू लागले होते. कुठेकुठे त्यावर धुकंही पांघरल्या जात होतं. क्षणातच वार्‍याच्या झुळकीमुळं धुक्यात धबधबा झाकला जायचा आणि क्षणातच पडदा बाजूला व्हायचा तसंच निसर्गाचं खळाळतं हास्य नजरेत पडायचं. 
 
निसर्गाचं हे सौंदर्य अनुभवने म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच मिळाल्यासारखे वाटत होते. २०२७ चौ. किलोमिटरच्या मेळघाटात हे निसर्गदृष्य वर्षाऋतुमध्ये जागोजागी पहायला मिळते. आणि पाहणार्‍याच्या मनाला नवीन उभारी मिळते. आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्याला अशा निसर्गरुपामुळे उर्जा मिळत असते. 
 
वर्षाऋतू हा सृजनपर्व सुरु करणारा ऋतू आहे. आकाश आणि धरतीच्या मीलनात ढग हे प्रेमदूत बनून येतात. मेघाचा अर्थ वर्षाव करणे असा होतो. जलधर, पयोधर आणि वारीवाह ही ढगांची तीन रुप आहेत. कालिदासाने वर्षाऋतूचं वर्णन ‘जलदसमय’ असे केले आहे. 
 
मेळघाटचे पावसाळी वनवैभव अनुभवता अनुभवता चातक पक्षाचे पिऊ,पिऊ, पिप्पी पिऊ हे शब्द अख्या रानावर पसरत होते. पाण्यासाठी त्याचीही आर्त हाक असावी. कारण हा पक्षी जमिनीवरचे पाणी कधीच पीत नाही. झाडांच्या पाना-पानावर पडणार्‍या पाण्याचे थेंब तो पानाच्या शेवटच्या टोकाला चोच लावून ग्रहण करत असतो. संस्कृत काव्य ग्रथंतून चातक, मेघ आणि पाऊस यांच्या अन्योन्य संबंधाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीत म्हटले आहे - 
 
भरले सरिता समुद्र चहुंकडे । परि ते बापियांसी कोरडे
कां जे मेघौ नि थेंबुटा पडें ते पाणी की तया 
 
दरवर्षी चातक पक्षी मृगसरीसोबत येतात आणि पावसाळा संपला की भारतात किंवा पृथ्वीच्या ज्या भागात पाऊस पडतो त्या भागांकडे जातात. जाताना ती आपली पिलं येथेच सोडून जातात. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर तीही आपल्या मायबापांबरोबर निघून जातात. मेघाच्या जलबिंदूवर जीवननिर्वाह करण्याचा चातकाचा संकल्प एवढा प्रसिध्द आहे की, कालिदासाने त्यास ‘चातकव्रत’ हे नाव दिले आहे. 
 
सांज प्रहरी मेळघाटचं हृदयस्थान असलेल्या कोलकास वनविश्रामगृहावर पाहोचलो. पावसाचा जोर वाढला होताच. येथील संपूर्ण वनसृष्टीवर संधीछाया पसरली होती. गर्द हिरव्या वनराईतून वाहणार्‍या सिपना नदीच्या पात्रातून एक गूढरम्य आवाज येऊ लागला. तो होता नदीच्या खळाळण्याचा. जणू काही पुढे चला, पुढे चला सागराकडे असा तो आवाज होता. तशीही प्रत्येक नदी नाल्याची ओढ सागरास मिळण्यासाठीच असते. मायेची ओढ तशीचं ही सागरओढ आहे. या अंधारबनावर राज्य होते ते टिमटिमणार्‍या अद्भुत काजव्यांचे. तर दिगंतरात तारका पुंज्यांचे. वनश्रीवरील हे दृश्य मनमोहित करीत होते. 
 
मेळघाटातील सेमाडोह, कोलकास, हरिसाल, तारुबांदा, चिखलदरा परिसरातील अरण्यात पावसाळी भटकंती झाली. सारी निसर्गसृष्टी कशी हिरव्या रंगात न्हालेली दिसत होती. चिंब भिजलेली होती. सिपना, गडगा, खापरा, खंडू आणि डोलार ह्या नद्या ओसंडून वाहत आहेत. पक्षी जिवन संपन्न दिसत आहे. एकंदरीत सारी सजीवसृष्टी आल्हाददायी दिसत होती. सृष्टीचक्रात निसर्ग आपली विविध रुपं तिनही ऋतूत दाखवित असतो. मात्र पावसाळी वनवैभव अनुभवने म्हणजे नवचैतन्य मिळविणे असेच असते. 
 
निसर्ग देव आहे. दयाधन आहे. तसाच तो रुद्रभीषणही आहे. आणि तो करुणानिधीही आहे. त्याकडे श्रध्देने पाहिले पाहिजे. निसर्गावर प्रेम करा. निसर्गाचे रक्षण करा. यावर संबंध सजीवसृष्टीचे भवितव्य अवलंबून आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती