किल्ले हडसर

शनिवार, 10 जानेवारी 2015 (14:44 IST)
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वार म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाजाची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्‍या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे पाहणे म्हणजे दर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्य आहे. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटेपैकी एक टकेडीवर जाते तर दुसरी येथील प्रवेशद्वारापाशी. दुसर्‍या दरवाजातून वर आल्यावर समोरच पाण्याची टाकी आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. जवळच असलेल्या उंचवट्याच्या दिशेने जाऊन डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात  कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. त्यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे तलाव आणि महादेरू मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून, सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती गरुडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर सुरेख दिसतो. समोरच चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. 
 
जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर गावी पोहोचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते, तेथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठरावरील शेतामधून चालत गेल्यावर 15 मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बृरुजापाशी पोहोचतो. येथील महादेव मंदिरात 4 ते 5 जणांना राहता येते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपणच करावी लागते. 
 
राधिका बिवलकर 

वेबदुनिया वर वाचा