मनसेला कोणत्या जागा मिळण्याची शक्यता?

बुधवार, 20 मार्च 2024 (09:11 IST)
राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मनसेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई हा मराठीबहुल भाग आहे. याठिकाणी मनसेचीही ताकद आहे. सध्या इथं अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आहेत. गेल्या २ टर्मपासून ते महायुतीकडून उमेदवार होते. मात्र यावेळी ठाकरेंनी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर या भागात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. त्यात आता या जागेवर मनसेचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
 
मनसेला मिळणारी दुसरी जागा ही ग्रामीण भागातील असू शकते. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याबाबत विचार सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेले अमित ठाकरे हे उभे राहावेत अशी भाजपाची मागणी होती. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. 

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती