मतचिठ्ठीवर गडकरींचा फोटो, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (20:54 IST)
मतचिठ्ठ्या देण्यावरून भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे नागपूर मतदारसंघात पाहायला मिळाले. नागपूरमधील काही मतदार केंद्राजवळील भाजपाच्या बुथवर महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना दिल्या जात होत्या. भाजपाच्या या कृतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या बुथवरील यंत्र फोडण्यात आले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपाला त्यांचे यंत्र परत केले आहे.
 
महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पण नागपूर शहरातील नारा, जरिपटका आणि मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात भाजपाच्या बुथवर त्यांचे कार्यकर्ते मतदारांना गडकरींचे नाव आणि भाजपाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत असल्याचे निदर्शनास आळे. ‘कहो दिल से नितीन जी फिरसे..’ असे मतचिठ्ठ्यावर लिहिण्यात आले होते. मात्र भाजपा कार्यकर्त्यांच्या या कृतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला.

Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती