सत्तेत आणि विरोधात सुद्धा हिंदुत्ववादी?

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (16:45 IST)
सध्या महाविकासआघाडीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य हिंदूंच्या मनात अनेक प्रश्न आहेत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनतेने युतीला भरघोस मते आणि जागा दिली होती. पण सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असं सांगत मुख्यमंत्रीपदाचा मुकुट उध्दवजीनी स्वतःच्याच डोक्यावर चढवून घेतला आणि तोही काँग्रेसला सोबत घेऊन. त्यामुळे हिंदूंना नेमकं काय करायचं आहे आणि नेमकं काय घडलं आहे काही कळत नाहीये.
 
सध्या एक सिद्धांत मांडला जातोय की सत्तेत शिवसेनेसारखा हिंदुत्ववादी पक्ष आणि विरोधातही हिंदुत्ववादी पक्ष. हा सिद्धांत किती खरा आहे? मुळात शिवसेनेची स्थापना झाली ती काँग्रेसच्या बळावर. असो. शिवसेनेचा जन्म प्रादेशिक अस्मितेतून झाला आहे. म्हणजे मराठी माणसासाठी झटणारी संघटना. त्यांची पालिकेत काँग्रेससोबत युती होती. हिंदुत्व स्वीकारल्यानंतर भाजपसोबत युती झाली आहे. म्हणजे शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारलं आहे आणि भाजपचा पिंड हिंदुत्व आहे. भाजप हा संघाच्या मुशीतून निर्माण झालेला पक्ष आहे. शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारल्यानंतर मराठी मुद्दा गुंडाळून ठेवला. बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट ही उपाधी अचानक दिली गेली. बाळासाहेबांची वेशभूषा अचानक बदलली. अमराठी लोकांना आकृष्ट करण्यासाठी हिंदी सामानाची निर्मिती झाली. शिवसेनेने जेव्हा जेव्हा नवीन मुद्दे स्वीकारले आहेत तेव्हा जुन्या मुद्द्याना तिलांजली वाहिली आहे. आणीबाणीला सपोर्ट करून शिवसेनेने एकाप्रकारे अनेकांना फसवलंच होतं. पण त्याचंही छान भांडवल केलं गेलं. बाळासाहेब नेहमीच इंदिराबाईंची स्तुती करायचे, आणीबाणीच समर्थन करताना लोकशाहीवर टीका करायचे आणि लोकशाहीनुसार निवडणूक लढवून काही ठिकाणी सत्ताही मिळवायचे. हा विरोधाभास होता. पण बाळासाहेब बोलायचे आणि शिवसैनिकांना ते पटायचं. राजू परूळेकर सुंदर लिहितात "बाळासाहेब हे शिवसेनेचे प्रेषित आहेत". प्रेषिताचा शब्द अंतिम असतो, प्रेषिताच्या पलीकडे काही नसतं. ईश्वराकडे घेऊन जाणारा तोच एकमेव असतो. मुळात ईश्वर त्याच्याच रूपाने बोलत असतो अशी श्राद्धा आहे. 
 
शिवसेना त्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून वावरली आहे. इतकी की त्यांचा जन्मच मुळी हिंदुत्वासाठी झाला आहे. हिच शिवसेनेची खासियत आहे. शिवसैनिकही स्वतः अशाच थाटात वावरत असतात. मग त्यांच्यातील कुणी डॉक्टर असो, इंजिनियर असो, सीएस असो व वकील असो. सगळेजण तेच मुद्दे मांडतात. म्हणजे वरील डिग्र्या प्राप्त करायला प्रचंड बुद्धिमता लागते. पण पक्षाचा विषय आला की सगळ्यांची मते जुळतात. ही या संघटनेची ताकद आहे. मी अनेकदा सांगितलंय की शिवसैनिक हे हिंदुत्ववादी नसून ठाकरेवादी आहेत. ठाकरे सांगतील ती दिशा, ठाकरे सांगतील तो धर्म. म्हणून तर शिवसेनेने काँग्रेससोबत युती केल्यावर एकाही शिवसैनिकाला प्रश्न पडला नाही की काँग्रेससोबत युती कशी करू शकतात साहेब? हा प्रश्न पडत नाही कारण ठाकरेंच्या सुखात त्यांचं सुख आहे. अचानक मराठीवादी असलेले शिवसैनिक हिंदुत्ववादी कसे होतील? आणि अचानक हिंदुत्ववादी असलेले शिवसैनिक सेक्युलर कसे होतील. ते होतात कारण ठाकरेंच्या हितात त्यांचं हित आहे. नेहमी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असाच उच्चार करणारे शिवसैनिक अचानक त्यांना वंदनीय कसे म्हणू शकतील? उद्धवजीनी काँग्रेसचा हात धरल्यानंतर मुंबईत मी जिथे जिथे फिरलो तिथे मला बॅनरवर हिंदुह्रदयसम्राट ऐवजी वंदनीय बाळासाहेब लिहिलेलं आढळलं. हे अचानक कसं होईल? याचा अर्थ आदेश पाळला जातोय. सोनियाबाईनी उध्दवजीना अट घातली असणार आणि उध्दवजीनी सर्वांना तसा आदेश दिला असणार. या सर्व गोष्टी लोकांना इतक्या सहज आणि साध्या कशा वाटू शकतात? 
 
आता आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहू. शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन केल ही कदाचित राजकीय म्हणून मोठी घटना नसावी. अनेक युत्या होता, आघाड्या होता. सत्ता स्थापन होते व सत्तेपासून अनेक दुरही जातात. मग शिवसेनेने काँग्रेससोबत जाणे याला विरोध का? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकमान्य टिळकांचा काळ वगळता काँग्रेसला नव्या राष्ट्रवादाची निर्मिती करायची होती. त्यासाठी त्यांनी हिंदुराष्ट्रवादाला तिलांजली वाहिली आहे आणि त्यांना एका नव्या राष्ट्राची रचना करायची होती. हा काँग्रेसचा अट्टाहास होता. तो अट्टाहास पूर्ण करण्यासाठी हिंदूंनी पराकोटीचा त्याग करावा अशी त्यांची धारणा होती. अर्थात काँग्रेसचा हा प्रयोग फसला म्हणून फाळणी झाली. फाळणी आपल्या मुर्खपणामुळे झालीय हे लपवण्यासाठी अनेक सिद्धांत मांडले गेले. त्या खोलात आपण नको शिरूया. त्यावेळी काँग्रेसच्या चुकीच्या विचारधारे विरोधात सावरकरांसह अनेकांनी लढा दिला आहे. भारताचं भावविश्व हिंदू राहावं यासाठी अनेक लोक झटले आहेत आणि त्यातून संघाचा जन्म झाला. संघाच्या राष्ट्रीय उत्सवात शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आहे. यास हिंदू साम्राज्य दिन असं नाव देण्यात आलं. आज संविधानिक बाबी पाळल्या नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनी विद्यमान सरकारवर टीका केली तेव्हा उध्दवजीनी शिवरायांची शपथ घ्यायला विरोध का? असा मुद्दा मांडला आणि म्हणाले हा महाराष्ट्र मला अपेक्षित नाही. पण अतिरेकी कारवाईत अडकलेल्या संजय दत्तला सोडवताना शिवरायांची शपथ घेतली होती का? असा प्रश्न एकाही शिवसैनिकाला पडत नाही. म्हणजे इतक्या वर्षात शिवसेनेने केवळ हिंदुत्वासाठी झटतील अशी पिढी तयार केली नाही. संघाने अशा अनेक पिढया खर्ची घातल्या आहेत. काँग्रेसने भगवा आतंकवादाची पुंगी वाजवायला सुरुवात केली, सावरकरांचा यथेच्छ अपमान केला, बरं, भ्रष्टाचार इतका केला की सरकार हे भ्रष्टाचार करण्यासाठीच जन्माला येत अशी धारणा निर्माण झाली. इथे भ्रष्टाचाराचा मुद्दा ओघाने आला. पण आपण तो मुद्दा बाजूला ठेवूया आणि आपल्या मूळ मुद्द्यावर चिकटून राहूया. काँग्रेसने हिंदूचा उघड उघड द्वेष केलेला आहे. भगवा आतंकवाद म्हणत अनेक निर्दोष लोकांना पुरावा नसतानाही जेलमध्ये कोंडून ठेवलं होतं. मग स्वतः उध्दवजीना युती करताना हा प्रश्न पडू नये? 
 
तुम्ही शंभर वेळा शिवाजी महारांजांचं नाव घेता, मग तुम्हाला कोणतंही बहुमत नसताना व जाहिरपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं घोषित झालेल असताना, त्यावर तुम्ही कोणताही आक्षेप घेतला नसताना आचनका केवळ तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून काँग्रेससोबत आघाडी केली ज्यांनी नेहमीच हिंदुत्ववाद्यांना द्वेष केला, त्यांच्यासोबत जाताना एकदाही त्यांच्या मनात शिवरायांचा विचार नाही आला? वडिलांना दिलेलं वचन पूर्णच करायचं होतं तर छातीठोकपणे महाराष्ट्राला का संगीतल नाही की मी मुख्यमंत्री होणार आहे द्या शिवसेनेला बहुमत? का तुम्हाला इतक्या कमी जगा मिळाल्या? याचं उत्तर कोणाकडेच नाही.
 
आणि आता जे मुख्यमंत्री मंत्री आहेत ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नसून काँग्रेसच्या सरकारमधले मुख्यमंत्री आहेत. या पदासाठी त्यांनी पुष्कळ त्यागही केला आहे. अयोध्या दौरा रद्द केला आहे, राम मंदिराचा जल्लोष साजरा केलेला नाही, वडिलांची हिंदुह्रदयसम्राट ही उपाधी काढून घेतलेली आहे. त्यामुळे सत्तेत हिंदुत्ववादी आणि विरोधात हिंदुत्ववादी हा बालिश सिद्धांत आहे. आता हळूहळू बहुसंख्य हिंदूना आपला कोण परका कोण हे लक्षात येऊ लागलय. पुढील काळात ते स्पष्ट होईल. भारताचे भावविश्व यापुढे हिंदूच राहणार आहे आणि ते हिंदू राहिल्यामुळे भारत खऱ्या अर्थाने सेक्युलर राहणार आहे.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती