पुतिन यांचे विरोधक अ‍ॅलेक्सी नवालनी यांचं तुरुंगात निधन

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (18:27 IST)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर टीका करणारे अ‍ॅलेक्सी नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे.
 
अ‍ॅलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते होते.
 
ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ लाखो लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत, असं म्हटलं जायचं.
 
नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट 2020 रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले.
 
त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं होतं. तिथून उपचार घेऊन ते पुन्हा रशियामध्ये परतले होते.
 
अ‍ॅलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला होता.
 
2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.
 
हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.
 
कसा झाला होता विषप्रयोग?
रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अॅलेक्सी नवालनी यांच्यावर मध्यंतरी विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
 
नवालनी यांच्यावरील विषप्रयोग हा पाण्याच्या बाटलीतून किंवा चहातून करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
 
पण हा विषप्रयोग पाण्याच्या बाटलीत किंवा चहात विष ठेवून नव्हे तर अंडरवेअरमध्ये विष ठेवून करण्यात आल्याचा गौप्यस्फोट नवालनी यांनी केला होता.
 
अ‍ॅलेक्सी नवालनी यांनी स्वतःच या प्रकरणाचा शोध घेतल्याचं त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं होतं. याप्रकरणी त्यांनी रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हीस (FSB) वर आरोप केले होते.
 
याबाबतची सविस्तर बातमी बेलिंगकट नावाच्या शोधपत्रिकारिता करणाऱ्या माध्यमाने केली आहे.संबंधित बातमीनुसार, "अ‍ॅलेक्सी नवालनी यांनी हल्ल्यातील संशयिताला फोन केला. कोनस्टॅंटिन कुदरित्सेव्ह असं या संशयिताचं नाव आहे. नवालनी यांनी आपण एक रशियन FSB एजंट असून FSB च्याच फोनवरून बोलत असल्याचं भासवलं. नवालनी यांच्यावरील हल्ला अयशस्वी का ठरला, असा जाब त्यांनी कुदरित्सेव्ह यांना विचारला. त्यावेळी विषप्रयोगासाठीचं द्रव्य म्हणजेच नोविचोक हे नर्व्ह एजंट नवालनी यांच्या अंडरवेअरमध्ये ठेवण्यात आलं होतं, असा खुलासा कुदरित्सेव्ह याने संभाषणादरम्यान केला, असं नवालनी म्हणाले.
 
रशियाने फेटाळले होते आरोप
संभाषणादरम्यान, कुदरित्सेव्हने नवालनी यांना सांगितलं की विमानाचे पायलट आणि सायबेरियातील ओम्स्क येथील मेडिकल इमर्जन्सी टीम ही 'मोहीम' अयशस्वी ठरण्याचं कारण आहे. त्यानंतर नोवोचिकचा पुरावा नष्ट करण्यासाठी नवालनी यांचे कपडे गायब करण्यासाठीही कुदरित्सेव्ह यांना ओम्स्क येथे पाठवण्यात आलं होतं, असं त्याने सांगितलं.
 
रशियातील बीबीसी प्रतिनिधी स्टीव्हन रोसेनबर्ग यांच्या मते, ही रेकॉर्डिंग उघड होणं क्रेमलीनसाठी त्रासदायक ठरू शकतं. ते आतापर्यंत विषप्रयोगाशी आपला संबंध नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावत होते.
 
अ‍ॅलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला आहे. लष्करी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या विषशास्त्राच्या चाचणीत नोविचोक एजंटचा एक 'अस्पष्ट पुरावा' दिसल्याचा दावा करण्यात येत होता.
 
नवालनी यांच्या गटाच्या दाव्यानुसार, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशानुसारच नवालनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मात्र, क्रेमलीननं (पुतीन सरकार) हे आरोप फेटाळले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती