फेसबुक, इन्स्टाग्राम अचानक बंद पडलं तर काय होईल?

गुरूवार, 7 मार्च 2024 (12:45 IST)
5 मार्च 2023ला अचानक फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं. मेटा या पालक कंपनीने काही तांत्रिक बिघाडामुळे असं घडल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि काही काळानंतर हे दोन्ही अ‍ॅप्स पूर्ववत झाले. फेसबुक सुमारे एक तास बंद होतं आणि याकाळात जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सुरु होते त्या व्हाट्सअ‍ॅप आणि 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. काहींनी या घटनेचा संबंध थेट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांच्याशी लावला तर काहींना निवडणुकांपूर्वी फेसबुक बंद करून काहीतरी घडवलं जात असल्याचा संशय आला. एकीकडे फेसबुक आणि इंस्टाग्रामशिवायच्या या दीड तासांच्या काळात अनेक कल्पक डोक्यांमधून वेगवेगळ्या मजेशीर मीम्सचा पाऊस पडत होता तर दुसरीकडे दर पाच मिनिटांनी फेसबुक उघडून जगाशी कनेक्टेड राहणाऱ्यांची मात्र घालमेल वाढत चालली होती. आता फेसबुक सुरु होईल की नाही? लॉग आउट झालेलं माझं अकाउंट पुन्हा सुरु होईल का? मी फेसबुकवर अपलोड केलेली माहिती आणि फोटो चोरीला जातील का इथपासून ते आता मी माझ्या रिकाम्या वेळेत काय करू? इथपर्यंत नेटकऱ्यांनी असे प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. अर्थात इंटरनेटच्या जगात इंटरनेटवर जगणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे, काही जणांचे व्यवसायही संपूर्णतः इंटरनेटवरच अवलंबून आहेत. त्यामुळे फेसबुक बंद पडल्यानंतर त्यांची घालमेल आपण समजू शकतो पण इंटरनेटवरून एक रुपयाही न कमावणाऱ्या आणि केवळ मनोरंजनासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची अस्वस्थता काहीतरी वेगळं आणि गंभीर सांगत होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "फेसबुक आणि इंटरनेटच्या जमान्यात माणसाकडे 'रिकामा वेळ' असा काही राहिलेलाच नाही. थोडी उसंत मिळाली की मोबाईल आपोआप हातात येतो आणि माणूस स्क्रोल करायला लागतो. आजकाल माणसं बोअरच होत नाहीत. त्यांना कंटाळाच येत नाही कारण मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या खिशात तुम्ही सतत विरंगुळा घेऊन फिरत असता. त्यामुळे कंटाळा आलाय आणि त्यातून आपण काहीतरी कल्पक गोष्टी केल्यात असं आता घडतच नाही." नागराज मंजुळेंनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाच्या अनुपस्थितीत आलेलं रितेपण ही खरोखर गंभीर बाब आहे का? फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर अशी माध्यमं आपल्या आयुष्यातून काढून टाकली तर खरोखर काही उरतं का? आणि जर तसं होत नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? भारतात आणि संपूर्ण जगभरात सोशल मीडियाने आपलं आयुष्य किती व्यापून टाकलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला आणि मेंदूला वाचवून ठेवायचं असेल ते नेमकं काय करावं लागेल? याचाच धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
 
जगभरात किती लोक फेसबुक वापरतात?
फेसबुकने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 पर्यंत 490 कोटी लोक सोशल मीडिया वापरत होते. तर फोर्ब्स नियतकालिकाच्या अंदाजानुसार 2027 पर्यंत जगभरात 5 अब्ज 85 लाख लोक सोशल मीडियावर येतील. फेसबुक हे जगातलं सगळ्यात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरात सुमारे 3 अब्ज लोक फेसबुक वापरतात. भारतात सुमारे 44.8 कोटी लोक फेसबुक वापरतात. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31.8% लोक फेसबुक वापरतात. थोडक्यात काय तर भारत हा फेसबुक वापरणारा सगळ्यात मोठा देश आहे. भारतात सुमारे 51.6 कोटी लोक इन्स्टाग्राम वापरतात. 2023 च्या आकडेवारीनुसार इंस्टाग्राम हे आपल्या देशातलं सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता एवढे लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स बंद पडल्यावर साहजिकच भारतातील नेटकऱ्यांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होणार होता. अपेक्षेप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची भरपूर चर्चाही झाली. मार्क झकरबर्ग आणि फेसबुकची खिल्ली उडवण्यात एक्सचे सीईओ इलॉन मस्क हेही मागे राहिले नाहीत. एक्सवर ट्विट करून त्यांनी लिहिलं की, "तुम्ही ही पोस्ट वाचू शकताय याचा अर्थ आमचे सर्व्हर्स सुरु आहेत."
 
सोशल मीडिया बंद पडला तर काय परिणाम होऊ शकतो?
सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो. म्हणजे जर समजा सोशल मीडिया वापरणारा एक माणूस 73 वर्षे जगला तर त्याच्या आयुष्यातली 5.7 वर्षे तो सोशल मीडियासाठी खर्च करेल. त्यामुळे सोशल मीडिया अचानक बंद पडला तर अनेकांना मानसिक आजार होऊ शकतात, नैराश्य येऊ शकतं. या मानसिक परिणामांसोबतच आजकाल सोशल मीडियाचा वापर करून व्यवसाय करणाऱ्या अनेकांचं कोट्यवधींचं नुकसानही होऊ शकतं. सोशल मीडियावरून व्यवसाय करणारे नेमके किती लोक आहेत हे आता आपण आकडेवारीवरून समजून घेऊया.
 
किती व्यावसायिक सोशल मीडियाचा वापर करतात?
बिजनेस स्टॅंडर्डने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये 15 लाख लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योजकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा वापर केला. हा आकडा कोरोनापूर्वीचा आहे. कोरोनाकाळात ऑनलाईन बिजनेसेसमध्ये वाढ झाली. अनेक उद्योग डिजिटल झाले त्यामुळे मागच्या पाच वर्षात हा आकडा कोट्यवधींपर्यंत पोहोचला आहे. आजकाल सोशल मीडियावर अनेकांनी नवनवीन उद्योग सुरु केले आहेत. महिन्याला लाखो रुपये कमावणारे इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्स आपल्या अनेकांना माहिती असतील. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे आठ कोटी कन्टेन्ट क्रिएटर्स आहेत. त्यामुळे फेसबुक आणि व्हाट्सअप बंद पडलं तर यामुळे कोट्यवधींचं नुकसान होईल हे स्पष्ट आहे. 2021च्या ऑक्टोबर महिन्यात सहा तासांसाठी फेसबुक बंद पडलं होतं. त्यावेळी फोर्ब्सच्या एका बातमीनुसार फेसबुकचं सुमारे पाच अब्ज रुपयांचं नुकसान झालं होतं.
 
यापासून स्वतःला कसं वाचवता येईल?
सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम या विषयावर अनेक बातम्या, लेख पुस्तकं लिहिली गेली आहेत. असं असलं तरीही सोशल मीडिया हा कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याच्या दुष्परिणामांपासून वाचायचं असेल तर सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे. सोशल मीडियाचे अ‍ॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करत असताना आपण कोणकोणती माहिती देत आहोत, त्या अ‍ॅपला कोणत्या परवानग्या देत आहोत हे सजगपणे बघणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच सोशल मीडियापासून काहीकाळ ब्रेक घेणं शक्य असल्यास तो घ्यावा आणि त्याकाळात इतर अर्थपूर्ण गोष्टी कराव्यात असं तज्ज्ञांना वाटतं.
 
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे, तंत्रज्ञानाला पूर्णपणे बाजूला सारणं. म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही स्क्रीनपासून पूर्णपणे दूर जाता. मग ते सोशल मीडिया असो, व्हिडिओ कॉन्फरन्सिग असो किंवा तसंच दुसरं एखादं डिजिटल प्लॅटफॉर्म. डिजिटल डिटॉक्सिंगचा अर्थ तणाव किंवा चिंता कमी करून लोकांना वास्तव जगाशी एकरुप करणं हा आहे. तसं पाहता अद्याप तंत्रज्ञानापासून दूर राहण्यामुळं होणारे फायदे, शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. पण डिजिटल डिटॉक्सिंग हे एक मोठं आव्हान बनत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र काही दिवस फोनपासून दूर राहण्यासारखे काही उपाय वगळता, आजच्या काळात बहुतांश लोकांसाठी डिजिटल डिटॉक्सिंग हे अशक्य बनलं आहे. अमेरिकेच्या सिएटलमधील स्क्रीन टाइम मॅनेजमेंट विषयातील तज्ज्ञ कन्सलटंट एमिली चेरकिन म्हणतात की, "आपल्या जीवनात आता तंत्रज्ञानानं पूर्णपणे प्रवेश केलाय. आपण अॅपद्वारे बँकिंग करतो. फोनवर रेस्तरॉमधला मेन्यू वाचतो आणि स्क्रीनवर येणाऱ्या निर्देशांनुसार व्यायाम करत असतो, तंत्रज्ञानानं आपल्या जीवनाभोवती एवढं घट्ट जाळं विणलंय की, एका आठवड्यासाठीही फोनपासून दूर जाण्याचा विचार करणं म्हणजे डिजिटल डिटॉक्सिंगमध्ये अपयशाकडे वाटचाल ठरते." तज्ज्ञांच्या मते, ज्यांना पूर्णपणे स्क्रीनपासून दूर जाणं शक्य नाही, ते तंत्रज्ञानाच्या वापराच्या त्यांच्या सवयीवर लक्ष केंद्रीत करू शकतात. तसं केल्यास तंत्रज्ञानाचा अधिक उपयुक्त वापर करणं त्यांना शक्य होईल. "मी माझ्या फोनवर अनेक ट्रॅकिंग टूल्सचा वापर करायला सुरुवात केली होती," असं ऑरेगनमध्ये राहणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञ अंबर केस म्हणाल्या. अंबर यांच्या लक्षात आलं की त्या, एका दिवसात 80 वेळा इन्स्टाग्राम क्लिक करतात. त्यामुळं त्यांनी वन सेक नावाचं एक प्लगइन डाऊनलोड केलं. हे प्लगइन यूजर्सना फोनवर एखादं अॅप उघडण्यापूर्वी थांबून आधी विचार करण्याची एक संधी देतं. फावल्या वेळेत सहज म्हणून स्क्रोलिंग करण्याच्या सवयीपासून सावध व्हायला हवं असं केस म्हणतात. गरज नसेल तेव्हा फोन स्वतःपासून दूर ठेवण्याची सवय लावा. लोकांना सिगारेटच्या व्यसनासारखं फोनचं व्यसन लागतं, असंही त्या म्हणतात.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती