धर्मगुरूंसह सात जणांची आत्महत्या, 'पुनर्जन्म मिळेल' असा केला होता उपदेश

शनिवार, 6 जानेवारी 2024 (16:53 IST)
श्रीलंकेमध्ये एका धर्मगुरूंसह सात जणांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्यास लवकरच पुनर्जन्म होईल, असं सांगितल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं.
47 वर्षांचे रुआन प्रसन्न गुणरत्ने यांनी बुद्ध धर्माचा चुकीचा अर्थ लावून देशातील वेगवगळ्या भागांमध्ये त्या पद्धतीनं उपदेश दिला होता असं सांगण्यात येत आहे.
 
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आलं की, आत्महत्या केल्यानंतर लवकरच तुमचा पुनर्जन्म होईल असं त्यांनी त्यांच्या उपदेशांमध्ये सांगितलं होतं.
 
गुणरत्ने यांनी सुरुवातीला एका रासायनिक प्रयोगशाळेत कर्मचारी म्हणून काम केलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे.
 
त्यानंतर त्यांनी काही वेळासाठी त्या प्रयोगशाळेतली नोकरी सोडली आणि श्रीलंकेतील विविध भागांमध्ये शिकवणी किंवा उपदेश देत होते. त्यांनी अचानक 28 डिसेंबर रोजी आत्महत्या केली.
 
तपासावरून हे लक्षात आलं की, त्यांनी होमांगा भागातील त्यांच्या घरामध्येच विष घेऊन आत्महत्या केली.
 
त्यांच्या पत्नीनंही तीन मुलांना जेवणातून विष देत स्वतःदेखिल आत्महत्या केली, असंही पोलिसांनी सांगितलं.
 
सुरुवातीला पोलिसांना असं वाटलं होतं की, 'पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्यानं आणि त्यातून सावरू न शकल्यानं पत्नीनं तीन मुलांना विष देऊन स्वतःदेखिल आत्महत्या केली असावी. पण नंतर या घटनेबाबत विविध प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी वेगळ्या दृष्टिकोनातून याचा तपास सुरू केला.'
 
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी या कुटुंबाच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
 
अंबलंगोडा भागातील पीरथी कुमारा नावाच्या 34 वर्षांच्या या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली.
 
त्या व्यक्तीनं सांगितलं की, आत्महत्या केलेल्या या धर्मगुरुंच्या उपदेशांच्या काही कार्यक्रमांमध्ये काही वर्षांआधी ते सहभागी झाले होते.
 
त्यामुळेच धर्मगुरू आणि त्यांच्या कुटुंबांच्या अत्यंविधीमध्ये सहभाग घेतल्यानं त्यांनी सांगितलं.
 
त्यांनी पोलिसांना सांगितलं की, 'त्यांच्या उपदेशांमध्ये आत्महत्या करण्यासारख्या मुद्द्यांचाही समावेश असायचा.'
 
त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की,' धर्मगुरुंनी लवकरच पुनर्जन्म घेण्याच्या इराद्यानं आत्महत्या केली होती.'
 
याच साखळीमध्ये नंतर धर्मगुरुंच्या उपदेशांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांना दिलेल्या 34 वर्षींय पीरथी कुमारा यांनीही आत्महत्या केली.
 
महारागामा भागातील एका हॉटेलमधून पोलिसांना त्यांचा मृतदेह मिळाला.
 
त्यांनी 2 जानेवारी रोजी कोणतं तरी गुंगीचं औषध घेऊन आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
 
त्यांनी जे औषध घेऊन आत्महत्या केली असा संशय आहे ते औषध पोलिसांनी हॉटेलमधून जप्त केलं आहे.
 
याचप्रकारे धर्मगुरू आणि त्यांच्या कुटुंबाच्या अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या आणखी एका महिलेनंही विष घेऊन आत्महत्या केली. त्यांनी याक्कला भागातील त्यांच्या घरीच आत्महत्या केली.
 
पोलिसांनी सांगितलं की, आत्महत्या केलेल्या महिलेनंही या धर्मगुरुंच्या उपदेशांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती, असं तपासात समोर आलं आहे.
 
या सर्वांनी आत्महत्येसाठी एकाच प्रकारच्या विषाचा वापर केला होता का? याचाही तपास करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
 
तसंच ज्या व्यक्तीनं धर्मगुरुंच्या उपदेशांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं होतं, तिचीही पोलीस विविध दृष्टिकोनातून चौकशी करत आहेत.
 
काही जणांची तपासादरम्यान ओळख पटवण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली.
 
त्यांच्या मनातही अशाप्रकारे काही भावना तर निर्माण झालेल्या नाहीत ना? याचाही तपास घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
 
वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचे प्रवक्ते निहाल तालुदा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, त्या सर्वांनी सायनाइडसारख्या विषाचा वापर करून आत्महत्या केली.
 
"चारही प्रकरणांमध्ये झालेले मृत्यू जवळपास सारखेच होते. आम्हाला एक बॅग मिळाली ज्यात विषारी पदार्थ असल्याचा संशय होता. लहान बादलीमध्येही विष आढळलं. आम्हाला वाटतं ते सायनाइड असावं. आम्ही लॅबच्या रिपोर्टनंतर तुम्हाला नेमकी माहिती देऊ. पण ते अत्यंत हानिकारक असतं," असं निहाल तालुदा म्हणाले.
 
धर्मगुरुंनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा उपदेश दिला होता हे तपास पथकाच्या तपासात समोर आलं आहे. मृत्यू झाल्यानंतर आणखी उच्च दर्जाचा जन्म मिळेल असाही उपदेश देण्यात आला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे अनेक लोक होते. ज्यांनी उपदेशाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यांनी आपल्या नातेवाईकांनाही हे सांगण्याची विनंती त्यांनी केली होती.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती