नरेंद्र मोदींना बांगलादेश दौऱ्यात विरोध, हिंसक आंदोलनात 5 जणांचा मृत्यू

शनिवार, 27 मार्च 2021 (10:19 IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी ढाक्यात पोहोचले आहेत.
 
एकीकडे नरेंद्र मोदी बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना, दुसरीकडे चटगांवमध्ये मोदींच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहेत. या प्रदर्शनात आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनावेळी 5 जणांचा मृत्यू झाला.
 
बीबीसी बांगलाच्या माहितीप्रमाणे, एका पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चार लोकांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
ढाक्यात विरोध प्रदर्शन
नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शुक्रवारी नमाज संपल्यानंतर ढाका शहरातील बैतुल मुकर्रम परिसरात विरोध प्रदर्शन करण्यात आलं. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. यात काही पत्रकारही जखमी झाले.
 
बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तांनुसार, चटगांवमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हथाजरी मदरश्यातून विरोध मोर्चा काढण्यात आला होता.
 
पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत अनेक लोक जखमी झाले आहेत.
 
चटगांव मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार लोकांचा मृत्यू झालाय.
 
हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे नेते मुजिबुर रहमान हामिदी यांनी त्यांच्या काही आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यांच्या दावा आहे की, पोलिसांनी प्रदर्शन करणाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
 
पोलीस स्टेशनवर दगडफेक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यातील वृत्तपत्रांनी प्रदर्शनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी हथाजरी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली अशी माहिती दिली आहे.
 
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
 
गेल्याकाही दिवसांपासून अनेक मुस्लिम संघटना आणि डाव्यापक्षांच्या संघटना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात रॅली काढत आहेत. त्यांचा दावा आहे की, शेख मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष देशासाठी संघर्ष केला आणि मोदी धार्मिक नेते आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून ढाक्याला पोहोचले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती