‘लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारी व्हीडिओ चॅट साईट मी अशी बंद पाडली’

शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (13:22 IST)
-जो टिडी
सायबर सिक्युरिटी प्रतिनिधी
 
“ओमेगलवर लहान मुलांचा बळी जाणं मी थांबवलं आणि मला त्याचा अभिमान आहे.”
 
हे वाक्य आहे लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारी ओमेगल ही साईट बंद पाडणाऱ्या महिलेचं.
 
ती एम किंवा अॅलिस या नावाने ओळखली जाते. कोर्टाच्या कागदपत्रातही तिचा हाच उल्लेख आहे. ही साईट बंद पडल्यानंतर ती पहिल्यांदाच माध्यमांशी बोलली आहे.
 
तिने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या वेबसाईटच्या मालकांशी कोर्टाबाहेर तडजोड करताना तिने मुख्य अट ठेवली होती की ही साईट बंद करण्यात येईल.
 
या महिलेने अनेक वर्षं कायदेशीर लढा दिला. या साईटने तिचा संबंध एका बाल लैंगिक शोषण करणाऱ्या माणसाशी जोडला आणि त्याने या महिलेला डिजीटल सेक्स स्लेव्ह बनवलं.
 
नक्की प्रकरण काय?
2021 साली तिचं शोषण करणारा पुरुष रायन फोर्डिसला कॅनडात 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दोन मुलांचा बाप असणाऱ्या रायनकडे एमचे 220 फोटो आणि व्हीडिओ होते. ती 11 वर्षांची असल्यापासून त्याने हे फोटो आणि व्हीडिओ गोळा केले होते ज्यात त्याने एमला लैंगिक क्रिया करण्यासाठी भाग पाडलं होतं.
 
त्याने तीन वर्षं तिचं ऑनलाईन शोषण केलं. त्याने इतर पाच मुलींचंही शोषण केलं ज्यातल्या तिघींना तो ओमेगलवर भेटला होता.
 
“त्याने मला जाळ्यात अडकवलं आणि अशा गोष्टी करायला भाग पाडलं ज्या एका लहान मुलीने कधीच करू नये,” बीबीसीशी बोलताना एम म्हणते.
 
तिने ओमेगलवर खटला भरला आणि 22 दशलक्ष डॉलर्सची भरपाई मागितली. आता एम आणि ओमेगल यांनी कोर्टाबाहेर तडजोड केली आहे. या प्रकरणी एमला किती नुकसानभरपाई मिळाली हे स्पष्ट झालं नाही.
 
तिचं म्हणणं आहे की कोर्टाबाहेर तडजोड करणं तिच्यासाठी आणि इतर पीडितांसाठी चांगलं आहे.
 
“कोर्टात केस चालली असती तर मला साईट बंद पाडता आली नसती, त्यामुळे मला हे मान्य करावं लागलं,” ती म्हणते.
 
ती पुढे म्हणते, “कोर्टात केस चालली असती तर निकाल यायला अनेक वर्षं गेली असती, तोवर ही साईट सुरू राहिली असती आणि लहान मुलांचं शोषणही. पण आता ही साईट मी बंद केली याचा मला अभिमान आहे.”
 
काय होती ओमेगल साईट?
लिफ ब्रुक्स या व्यक्तीने ही साईट 2009 साली सुरू केली. त्यावेळी लिफचं वय होतं 18. त्याच्या वेबसाईटवरून अनोळखी माणसांना एकमेकांशी व्हीडिओ चॅट करता यायचं. ही साईट तुम्हाला एका परक्या माणसासोबत मॅच करायची.
 
बंद होण्यापूर्वी या साईटवर 7 कोटी 30 लाखाहून अधिक व्हीजिटर होते. यातले बहुतांश भारत, अमेरिका, मेक्सिको, यूके आणि ऑस्ट्रेलियातून यायचे.
 
तिथे वय पारखण्याची म्हणजे एज व्हेरिफिकेशनची कोणतीही यंत्रणा नव्हती आणि साईटवर कोणत्या प्रकारचा कंटेट जातोय हेही तपासलं जातं नव्हतं.
 
त्यामुळे ओमेगल लवकरच व्हीडिओ चॅटव्दारे होणाऱ्या लैंगिक चाळ्यांसाठी प्रसिद्ध झाली.
 
अनेक वर्ष याबद्दल तक्रारी येत होता. शेवटी ब्रूक्सने ओमेगलच्या होमपेजवर इशारा छापला की, ‘शोषणकर्ते या साईटचा वापर करतात.’
 
पण तसं होऊ नये म्हणून कोणतीही पावलं उचलण्यात आली नाहीत.
 
2020 चा लॉकडाऊन लागला तेव्हा ओमेगलची लोकप्रियता फारच वाढली. लोक घरात अडकून पडले होते त्यामुळे या साईटकडे वळले आणि यातून शोषणही वाढीस लागलं. बीबीसीने केलेल्या एका तपासात समोरं आलं की या काळात लहान लहान मुलांना कॅमेऱ्यावर लैंगिक चाळे करायला भाग पाडून अनोळखी लोक त्यांचं शोषण करत आहेत.
 
बीबीसीच्या दुसऱ्या एका बातमीत दाखवलं की कशाप्रकारे या मुलांच्या लैंगिक क्रिया रेकॉर्ड करून शोषणकर्ते त्यांना इतर गोष्टी करायला भाग पाडत आहेत.
 
गेल्या दोन वर्षांत बाललैंगिक शोषणाच्या 50 हून अधिक खटल्यांमध्ये या साईटचा उल्लेख झालेला आहे. इंटरनेट वॉच फाऊंडेशन आणि संयुक्त राष्ट्रांनी बाललैंगिक शोषण होतंय असं सांगूनही याकडे साईटच्या मालकांनी दुर्लक्ष केलं.
 
आता साईट बंद करताना लिफ ब्रूक्सने एक मोठं पत्रक जारी केलं. या पत्रकाच्या शेवटी म्हटलं की, “मी एमचे आभार व्यक्त करतो की तिने माझे डोळे उघडले आणि या साईट इतरांना होणारा त्रास समोर आणला.”
 
आपल्या पत्रकात असं वाक्य म्हणणं हे लिफला बंधनकारक होतं, त्याच्या कोर्टाबाहेर झालेल्या वाटाघटींमध्ये याचा उल्लेख होता.
 
पण ब्रूक्सने आपल्या पत्रकात असंही म्हटलं की ही साईट बंद होणं म्हणजे इंटरनेट स्वातंत्र्याला लागलेला धक्का होता.
 
ऐतिहासिक निर्णय
एमचा खटला आणि त्यातून पुढे झालेल्या वाटाघाटी एका अर्थाने ऐतिहासिक आहेत. कारण अमेरिकेत सोशल मीडिया खटले सहसा कोर्टात टिकत नाहीत आणि त्या कंपन्यांच्या विरोधात केलेल्या याचिका फेटाळून लावल्या जातात.
 
अमेरिकेच्या जनरल प्रोटेक्शन कायद्याच्या कलम 230 अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला त्यांच्या युझर्सनी त्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या गुन्ह्यांसाठी किंवा नियमभंगांसाठी दोषी मानता येत नाही.
 
पण एमच्या वकिलांनी एक नवा बचाव वापरला. त्यांनी म्हटलं की या खटला प्रॉडक्ट लायबिलीटीच्या अंतर्गत चालवला जावा कारण या साईटच्या डिझाईनमध्येच चुका आहेत.
 
या प्रकारचा बचाव आता अनेक खटल्यांमध्ये वापरला जातोय. इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटविरोधात चालू असलेल्या खटल्यांमध्येही याचा उल्लेख होतोय.
 
बाल तस्करी
एमच्या खटल्यातून आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे सोशल नेटवर्किंग साईटला बाल तस्करीसाठी जबाबदार ठरवता येण्याचा नवा पायंडा पडला.
 
एमच्या वकील कॅरी गोल्डबर्ग म्हणतात, “आमचा बचाव असा होता की आम्हाला हे सिद्ध करण्याची गरज नाही की ओमेगलला या विशिष्ट शोषणकर्त्याबद्दल माहीत होतं. त्यांच्या साईटवर अशा प्रकारचे गुन्हे होतात आणि त्यातून त्यांनी पैसा कमावला एवढं जरी आम्ही सिद्ध करू शकलो तरी पुरेसं आहे असं आमचं म्हणणं होतं. कोर्टाला ते पटलं.”
 
इंटरनेट वॉच फाऊंडेशनच्या ही संस्था इंटरनेटवरून चाईल्ड पॉर्नचं कंटेट काढून टाकण्याचं काम करते. या संस्थेच्या एका विश्लेषकाने बीबीसीला फेब्रुवारी महिन्यात सांगितलं की त्यांच्याकडे दर आठवड्याला ओमेगलचे 20 तरी व्हीडिओ येतात.
 
ही ‘धोकादायक वेबसाईट’ बंद झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
 
इंटरनेट वॉच फाऊंडेशनच्या कार्यकारी सुझी हार्गीव्हज म्हणतात की, “शोषणकर्ते ओमेगलचा वापर करून लहान मुलांना संपर्क करायचे आणि त्यांचं शोषण करायचे. मुलांना जाळ्यात कसं ओढता येईल याचीही चर्चा ते या साईटवर करायचे.”
 
त्या पुढे म्हणतात, “आम्ही ओमेगलला अनेकदा संपर्क केला आणि त्यांच्यासोबत काम करण्याची, तसंच मुलांसाठी ही साईट सुरक्षित करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही.”
 
बीबीसीने 2021 पासून ओमेगलचे संस्थापक लिफ ब्रुक्स यांना मुलाखतीसाठी वारंवार विचारणा केली आहे, पण त्यांनी याला नकार दिला.
 
2016 पासून लिफ ब्रुक्स सार्वजनिकरित्या काहीही बोलले नाहीयेत, सोशल मीडियावर पोस्टही केल्या नाहीयेत.
 
मुलाखतीला नकार दिल्यानंतर त्यांनी बीबीसीला एक मेल लिहिला ज्यात म्हटलं की त्यांची वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी त्यांनी एका तिसऱ्या कंपनीला कंत्राट दिलं होतं.
 
याआधी त्यांनी म्हटलं होतं की त्यांनी लहान मुलांच्या अधिकारांचं संरक्षण करणाऱ्या संस्थांसोबत काम केलं आणि शोषणकर्त्यांची माहितीही अनेकदा पुरवली आहे ज्यामुळे बाललैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती