मोरक्को भूकंपातील मृतांचा आकडा 820, सहाशेहून अधिक जखमी

शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (23:00 IST)
मोरक्कोमधील भूकंपातील मृतांचा आकडा 800 हून अधिक झाला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मोरक्कोच्या गृह मंत्रालयाने 820 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सहाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.
 
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.
 
मोरक्कोला शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री भूकंपाचा धक्का बसला.
 
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 6.8 एवढी होती. मोरक्कोच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली.
 
मोरोक्कोच्या उंच अशा ऍटलस पर्वराजींमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मार्राकेश शरहरापासून साधारण 71 किमी अंतरावर हा केंद्रबिंदू जमिनीच्या आत साडेअठरा किलोमीटर खोल होता, असं अमेरिकी भूगर्भ विभागानं म्हटलं आहे.
 
रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भूकंप आला. एक्सवर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. बीबीसीने स्वतंत्र्यरित्या या व्हीडिओंची पुष्टी केलेली नाही. भूकंपानंतर लोक रस्त्यांवर पळापळ करताना दिसत आहेत.
 
मार्राकेश शहराच्या जुन्या भागात काही इमारतींचं नुकसान झालं आहे. परत भूकंप आला तर आमचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावरच राहत असल्याचं एका स्थानिकानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
मार्राकेश शहरात इंटरनेट सेवा खंडीत झालीय.
 
भूकंपानंतर मार्राकेश शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. इंटरनेटवरही याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं इंटरनेट सेवेवर त्याचा परिणाम झाला.
 
मार्राकेशमधल्या ऐतिहासिक चौकाजवळील मशिदीच्या काही भागाची पडझड झालीय.
 
मोरोक्कोमधील सोशल मीडियावर व्हीडिओ आहेत, ज्यात मशिदीच्या मिनारच्या काही भागाची पडझड झालीय.
 
मार्राकेश शहरामधील प्रसिद्ध डीजेमा एल फना चौकातील हा मिनार आहे.
 
या मिनारचा काही भाग कोसळल्यानं दोन जण जखमी झाल्याचं एएफपीनं वृत्त दिलं आहे.
 
डीजेमा एल फना हा शहरातील हा मुख्य चौक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत हा परिसर आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्र आहे.
 
“लोक यामुळे मानसिक धक्क्यात आहेत. लहान मुलं रडत आहेत. त्यांचे पालकही भेदरले आहेत,” असं अब्देल्हक एल अमरानी यांनी एएफपीशी बोलताना म्हटलं आहे.
 
भूकंपामुळे वीज गेली आहे. तसंच फोनसुद्धा बंद पडले आहेत.
 
एएफपीच्या रिपोर्टनुसार एक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकून पडलं आहे. तर अनेकांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.
 
भूकंप एवढा शक्तीशाली होता की त्याचे धक्के मोरक्कोची राजधानी रबातमध्येसुद्धा जाणवले आहेत.
 
ज्या भागात हा भूकपं झाला आहे, तो दुर्गम आहे. त्यामुळे तिथं मोठी वित्त आणि मनुष्यहानी झाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
मार्राकेश शहरात रस्त्यावर लोक झोपले
रात्री भूकंपाच्या धक्क्यानं मोरोक्कनवासीयांमध्ये घबराट पसरली आहे. मार्राकेश अनेक घाबरलेल्या रहिवाशांनी बाहेर रात्र काढली.
 
फोटो आणि व्हीडिओमध्ये शहराच्या चौकात ब्लँकेट गुंडाळून झोपलेले दिसत आहेत.
 
फ्रेंच नागरिक मायकेल बिझेट यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, जेव्हा आपत्ती आली तेव्हा ते अंथरुणावर होते.
 
ते सांगतात , "मला वाटले की माझा पलंग उडून जाईल मी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर उतरलो आणि पण नंतर माझं घर पाहण्यासाठी गेलो."
 
"ही संपूर्ण अनागोंदी, मोठी आपत्ती, वेडेपणा होता."
 
दलिला फाहेम नावाच्या एका महिलेने रॉयटर्सला सांगितलं: "सुदैवाने मी झोपले नव्हते." तिच्या घराचं नुकसान झाल्याचं ती सांगते.
 
लोक उध्वस्त इमारतीखाली अडकले आहेत आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये जखमींना उपचारासाठी आणलं जातय .
 
ब्रिटिश पर्यटक अडकले
मार्राकेशमध्ये सुट्टीवर गेलेल्या ब्रिटीश पर्यटक लॉरेला पामर यांनी भूकंप झाला तेव्हा काय घडलं, याचं वर्णन त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
 
"खोली नुकतीच हालू लागली. मला वाटलं आमच्या शेजारी खोलीत कोणीतरी भिंतीजवळ घिरट्या घालत आहे," त्या पुढे सांगतात,
 
“काय घडतंय हे काळायच्या आधीच माझा पलंग थरथर हालायला लागला.”
 
पंतप्रधान मोदी यांचा शोक संदेश
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 शिखर परिषदेमध्ये व्यग्र आहेत.
 
त्याच वेळी त्यांनी मोरोक्कोमध्ये भूकंपानंतर झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केलाय.
 
सोशल नेटवर्क X (पूर्वीचे ट्विटर)वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, "मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळं झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झालं आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे."
 
भूविवर्तनीय हालचाली कारणीभूत
मोरक्कोच्या भूकंपाला भूविवर्तनीय हालचाली कारणीभूत असल्याचं मत बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी जोनाथन अमोस यांनी मांडलं आहे.
 
ते म्हणतात, 6.8 तीव्रतेचा भूकंप हा एक मोठा भूकंप आहे. तसेच पृथ्वीच्या या भागात फारच कमी भूकंप होतात. त्यातही मोरक्कोमध्ये असा मोठा भूकंप होणं फारच कमी दिसतं.
 
हा भूकंप दोन भूपट्ट म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांंना थडकल्यामुळे होतात. इथे युरोपचा भाग असणारा भूपट्ट आणि अफ्रिकेचा भाग असणारी भूपट्ट एकमेकांच्या जवळ येतात.
 
बहुतांश भूकंपीय हालचाली या अगदी संथ म्हणजे वर्षाला 4 मीमी अशा गतीने पुढे पुर्वेस भूमध्य सागराच्या दिशेने इटलीच्या आसपास, ग्रीस आणि तुर्कीयेच्या दिशेने होताना दिसतात.
 
तसेच अटलास पर्वताला भूपट्टानं सतत वर ढकलण्यामुळेही हा भूकंप झाला असू शकतो.
 
इसवी सन 1900च्याही आधीपासून या आज झालेल्या भूकंपाच्या केंद्रापासून 500 किमी अंतरात 6 रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद नाही.
 
रात्री झालेल्या भूकंपामुळे जास्त लोकांनी प्राण गमावल्याचं दिसून येतं. हा भूकंप स्थानिकवेळेनुसार रात्री 11 वाजून 1 मिनिटांनी झाला आहे, कदाचित यावेळेस अनेक लोक झोपी गेलेले असणार.
 
या भूकंपानंतर अफ्टरशॉक्ससाठीही आपण तयार राहिलं पाहिजे. साधारणपणे पहिल्या भूकंपापेक्षा 1 रिश्टर स्केल कमी तीव्रतेचा भूकंप जाणवू शकतो. किंवा लहान कंपांमुळे आधीच खिळखिळ्या झालेल्या इमारतींची आणखी पडझड होऊ शकते.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती