शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान, इम्रान खानना चितपट करणाऱ्या नेत्याचा असा आहे प्रवास

रविवार, 3 मार्च 2024 (17:25 IST)
शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवड झालीय.नॅशनल असेंब्लीमध्ये झालेल्या मतदानात त्यांना 201 मतं मिळाली, तर तहरीक-ए-इन्साफने समर्थन दिलेले उमेदवार उमर अयूब 92 यांना मतं मिळाली.
 
पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज (पीएमएल-एन) पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नॅशनल असेंब्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही.
 
या निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफ पुरस्कृत स्वतंत्र उमेदवार 90 हून अधिक जागांवर निवडून आले.
 
दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज पक्ष राहिला. त्यांना 75 जागा मिळाल्या. पाकिस्तान पीपल्स पार्टी 54 जागांवर विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. एमक्यूएम पाकिस्तानला 17 जागा मिळाल्या.
 
बऱ्याच वाटाघाटींनंतर बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पीएमएल-एनने केंद्रामध्ये सरकार बनविण्याचा निर्णय घेतला. मात्र नवाज शरीफ यांनी अचानक पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
 
पीपीपीने पीएमएल-एनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना मतदान करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याबदल्यात त्यांना राष्ट्रपतीपदासोबतच अन्य घटनात्मक पदांचं आश्वासन देण्यात आलं. अर्थात, पीपीपी शाहबाज शरीफ यांच्या कॅबिनेटचा भाग असतील की नाही, हे अजून निश्चित नाहीये.
 
आता 9 मार्चला पाकिस्तानात राष्ट्रपतींची निवड होईल. यासाठी पीपीपी आणि पीएमएल-एनसोबतच सहा पक्षांच्या आघाडीकडून आसिफ अली झरदारी ही उमेदवार आहेत.
पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, नॅशनल असेंब्लीत विरोधी पक्षनेते, इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या घडामोडीत पाकिस्तानचे पंतप्रधान आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान, असा शाहबाज शरीफ यांचा प्रवास रंजक आहे.
 
व्यावसायिक कुटुंबात जन्म
शाहबाज शरीफ यांचा जन्म पाकिस्तानच्या एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात झाला.
 
डेली टाईम्स वेबसाईटनुसार, ते मूळचे काश्मिरी पंजाबी आहेत. ते जम्मू-काश्मीरच्या मियां जातीशी संबंधित आहेत.
 
'इंडियन एक्सप्रेस'मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, शरीफ कुटुंब काश्मीरमधील अनंतनाग येथे राहणारं होतं. व्यवसायासाठी ते अमृतसर येथील जटी उमरा गावात राहण्यासाठी गेले. अमृतसरहून मग ते लाहोर येथे स्थायिक झाले. शाहबाज शरीफ यांच्या आईचे कुटुंब काश्मीरच्या पुलवामाचे आहे.
पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात 'इत्तेफाक ग्रुप' यशस्वी बनवण्यासाठी मुख्य भूमिका बजावली होती. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ यांनी या ग्रुपची स्थापना केली होती. डॉन वेबसाईटनुसार, 'इत्तेफाक ग्रुप' पाकिस्तानातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह आहे. स्टील, साखर, कापड, बोर्ड उद्योग यांसारखे व्यवसाय यात सामील आहेत. शाहबाज शरीफ या ग्रुपचे सह-मालक आहेत.
 
बीबीसीशी बोलताना पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक सुहैल वरैच सांगतात, "शाहबाज शरीफ यांचा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला होता. सुरुवातीला ते आपले मोठे भाऊ नवाज शरीफ यांना कामात मदत करायचे. भावाच्या मदतीनेच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला."
 
राजकारणात प्रवेश
1985 साली लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी शाहबाज शरीफ यांनी निवड झाली. 1988 साली ते पंजाब विधानसभेत निवडून आले. पण विधानसभा बरखास्त झाल्याने त्यांचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत.
 
यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवलं. 1990 मध्ये पाकिस्तान संसदेच्या नॅशनल असेम्ब्लिवर ते निवडून आले. त्यावेळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. नवाज शरीफ जेवढा वेळ पंतप्रधान राहिले तेवढाच वेळ शाहबाज शरीफ नॅशनल असेम्ब्लित राहू शकले.
लष्कराच्या वाढत्या दबावामुळे 1993 साली नवाज शरीफ यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. याचवर्षी शाहबाज शरीफ पंजाब विधानसभेत परतले आणि 1996 पर्यंत ते विरोधी पक्षनेते राहिले. 1997 साली ते तिसऱ्यांदा पंजाब विधानसभेवर निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले.
 
लष्करी उठावाच्या वेळी अटक
शाहबाज शरीफ पंजाबचे मुख्यमंत्री बनल्यानंतर दोन वर्षांतच पाकिस्तानात लष्करी उठाव झाला. 12 ऑक्टोबर 1999 या दिवशी संध्याकाळी जनरल परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधील सरकार पाडलं आणि शाहबाज शरीफ यांनाही अटक केली.
 
एप्रिल 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. जनरल मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण आणि दहशतवादाच्या आरोपाखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. जवळपास आठ महिन्यांनंतर पाकिस्तानच्या लष्करी सरकारने नवाज शरीफ यांना माफी दिली आणि कथित कराराअंतर्गत कुटुंबातील 40 सदस्यांसह त्यांना सौदी अरबला पाठवण्यात आलं. या 40 लोकांमध्ये नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ सुद्धा होते.
 
रॉयटर्स वृत्त संस्थेनुसार, पाकिस्तानमध्ये अटक होण्याचा धोका असूनही 2004 मध्ये अबू धाबी येथून फ्लाईटने ते लाहोरला पोहचले होते. काही तासांतच त्यांना सौदी परत पाठवण्यात आलं.
 
पाकिस्तानात पुनरागमन
पाकिस्तानच्या जियो न्यूजनुसार, 23 ऑगस्ट 2007 रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शाहबाज शरीफ आणि नवाज शरीफ पाकिस्तानात येऊ शकतात आणि राजकारणात सक्रिय होऊ शकतात असा ऐतिहासिक निकाल दिला.
नोव्हेंबर 2007 मध्ये नवाज शरीफ यांच्यासोबत शाहबाज शरीफ सुद्धा पाकिस्तानात परतले. 2008 मध्ये नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N)) यांनी चांगली कामगिरी केली परंतु ते सरकार स्थानप करू शकले नाहीत.
 
दुसरीकडे 2008 मध्ये शाहबाज शरीफ चौथ्यांदा पंजाब विधानसभेत निवडून आले आणि पुढचे पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहिले.
 
2013 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पंजाबमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने सत्तेत आला. शाहबाज शरीफ पंजाबचे मुख्यमंत्री बनले. तर नवाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची कमान सांभाळली. शाहबाज शरीफ यांना स्वत:ला मुख्यमंत्री ऐवजी पंजाबचे खादम-ए-आला म्हणजे मुख्य सेवक म्हणवून घेणं पसंत होतं.
 
लाहोरचं चित्र बदललं
शाहबाज शरीफ हे एक चांगले व्यवस्थापक आहेत असं पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक सुहेल वरैच यांना वाटतं. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "शाहबाज शरीफ यांनी केवळ लाहोर नव्हे तर संपूर्ण पंजाबचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ते पंजाबमध्ये त्यांच्या विकासकामांमुळे ओळखले जातात. मेट्रो बस आणि ऑरेंज ट्रेनचे श्रेय त्यांनाच जाते."
शाहबाज शरीफ यांनी सुरू केलेल्या 'स्वस्त पोळी' आणि 'लॅपटॉप योजना' यावर तीव्र टीका झाली, तर दुसऱ्याबाजूला 'आशियाना हाऊसिंग स्किम'साठी त्यांचं कौतुकही झाले.
 
नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून अघोषित ठरवलं होतं त्यावेळी शाहबाज शरीफ यांची पक्षाने अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
 
अनेक महिने तुरुंगात घालवले
पाकिस्तानमध्ये 2018 साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पीएमएल-एनने शाहबाज शरीफ यांना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. या निवडणुकीत तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हा पक्षा सर्वात मोठा ठरला आणि इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.
 
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वेबसाईटनुसार, 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक झाली. जवळपास 7 महिने ते लाहोरच्या कोट लखपत सेंट्रल जेलमध्ये होते आणि त्यानंतर ते बाहेर आले.
त्यावेळी इम्रान खान यांचे सल्लागार शाहदार अकबर यांनी त्यांचे पुत्र हमजा आणि सलमान यांच्यावरही बनावटी खात्यांच्या माध्यमातून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप केला होता. अटक होण्यापूर्वी शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर कटकारस्थान करून अटक केल्याचा आरोप केला होता.
 
विरोधी पक्ष एकवटले
24 मे 2021 रोजी शाहबाज शरीफ यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. ही भेट इस्लमाबादला झाली होती. यावेळी शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारला हटवण्यासाठी सर्वांनी एका व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं.
 
यानंतरही वेळोवेळी विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्या काही काळात तर पाकिस्तानच्या राजकारणात सर्व डावपेच खेळण्यात आले. एकामागोमागएक सत्ताधारी तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या सरकारमधून सहकाऱ्यांनी समर्थन मागे घेण्यास सुरूवात केली आणि इम्रान खान सरकार कोसळलं.
 
विरोधी पक्षाच्या अविश्वास ठरावाला 342 खासदारांच्या नॅशनल असेम्ब्लिमध्ये 172 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता होती. याच संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्या सरकारला सत्तेतून बाहेर केलं.
 
शाहबाज शरीफ यांचे लष्कराशी असलेले संबंध याविषयी बीबीसीशी बोलताना सुहैल वरैच सांगतात, "नवाज शरीफ यांच्या तुलनेत शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तान लष्कराशी चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे. ते चांगले राज्यपाल राहिले आहेत. नियंत्रणात आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. "
 
मुलाचे वडिलांच्या पाऊलावर पाऊल
शाहबाज शरीफ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना राजकीय विश्लेषक सुहैल वरैच म्हणाले, "2003 साली शाहबाज शरीफ यांनी तहमीना दुर्रानी यांच्यासोबत विवाह केला. हा त्यांचा तिसरा विवाह होता. या पत्नीपासून त्यांना मूल नाही. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत आणि दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. ते बहुतांश वेळ आपल्या पहिल्या पत्नीसोबत घालवतात."
शाहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ यांचा जन्म 6 सप्टेंबर 1974 साली लाहोर येथे झाला. त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर लंडन येथून स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून एलएलबीची पदवी प्राप्त केली.
 
हमजा शरीफ 2008 ते 2013 आणि 2013-18 दरम्यान सलग दोन वेळा पाकिस्तानचे खासदार राहिले आहेत. आता ते पंजाब प्रांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते स्पोर्ट्स बोर्ड पंजाबचे अध्यक्ष राहिले आहेत.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती