चीनचा तैवान सीमेजवळ युद्धसराव; लोक म्हणतात, 'आता हे नेहमीचंच झालंय'

सोमवार, 10 एप्रिल 2023 (20:20 IST)
चीनने सलग दुसऱ्या दिवशीही तैवानजवळ युद्ध सराव केल्याचं दिसून आलंय. तैवान आणि त्याच्या जवळील समुद्रात महत्त्वाच्या ठिकाणांवर मारा करण्यासाठी हा सराव केल्याचं चीनने सांगितलं आहे. हा युद्ध सराव तैवानसाठी 'कडक इशारा' असल्याचंही चीनने म्हटलंय. चीनने हा सराव करण्याचं मुख्य कारण आहे तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन यांनी केलेला अमेरिकेचा दौरा. त्या गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या.
 
चीनच्या या युद्धसरावाबाबत तैवानने संयम बाळगावा असा सल्ला अमेरिकेनी तैवानला दिला आहे.
 
तैवानच्या म्हणण्यानुसार, रविवारी चीनच्या 70 विमानांनी तैवानच्या हद्दीतून उड्डाण केलं. शिवाय समुद्रातही चीनची 11 जहाजं दिसली होती.
 
तैवानने शनिवारी सांगितलं की, चीनच्या 45 युद्ध विमानांनी तैवान स्ट्रेट लाईन ओलांडली आहे. (तैवान आणि चीनला विभागणारी सीमारेषा) किंवा तैवानच्या नैऋत्य भागावर उड्डाण केलं आहे.
 
पण चीनने दिलेल्या इशाऱ्याचा, तैवानची राजधानी तैपेईच्या लोकांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. लोक म्हणतात की ते आता नेहमीचंच झालं आहे.
 
चीनने उपसलं हत्यार
चीनने या लष्करी अभियानाला 'जॉइंट सोर्ड' असं नाव दिलंय. चीनचं हे अभियान सोमवारपर्यंत सुरू राहाणार आहे. चीनच्या या मोहिमेवर तैवानच्या प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.
 
तैवानच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी शनिवारी चीनवर आरोप करताना म्हटलंय की, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनने युद्ध सराव आरंभला आहे. यामुळे या भागातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय.
 
चीनने युद्ध सरावाच्या पहिल्याच दिवशी पिंगटान बेटाच्या जवळून एक जहाज नेलं आणि त्याचवेळी गोळीबारही केला. हे बेट तैवानच्या सर्वांत जवळच बेट आहे.
तैवानच्या काउन्सिल फॉर ओशन अफेयर्स या समितीने यासंबंधीचे व्हिडिओ ही प्रसिद्ध केले आहेत. यात तैवानचं एक जहाज चिनी युद्धनौकेचा पाठलाग करताना दिसत आहे.
 
मात्र हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, याविषयी या समितीने कोणतीही माहिती दिलेली नाही. ही समिती तैवानच्या किनारी भागतील सुरक्षेचं काम पाहते.
 
व्हिडिओ फुटेजमध्ये एक खलाशी रेडिओच्या माध्यमातून चीनला इशारा देताना दिसतोय. तो म्हणतो, "तुम्ही प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहात. कृपया माघारी फिरा आणि इथून ताबडतोब निघून जा. जर तुम्ही असेच पुढे जात राहिलात तर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला उपाययोजना कराव्या लागतील."
 
दुसर्‍या व्हिडिओमध्ये तैवानची युद्धनौका 'डिख्वा' आणि कोस्ट गार्डचं एक जहाज दिसतंय. यातलेच अधिकारी चीनला इशारा देताना दिसत आहेत.
 
तैवानच्या संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितलं की, शनिवारी संध्याकाळी चीनने सराव थांबबला. पण रविवारी पहाटे पुन्हा चीनच्या विमानांनी घिरट्या घालायला सुरुवात केली.
 
तैवान - चीनमध्ये 70 वर्षांपासून तणाव
1945-49 दरम्यान चीनमध्ये गृहयुद्धाची सुरुवात झाली. एका बाजूला माओत्से तुंगच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट होते तर दुसरीकडे च्यांग काई शेकच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गट होता.
 
पण च्यांग काई शेकच्या नेतृत्वाखालील गट वाईटरित्या हरू लागला. शेवटी आपली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी तैवान गाठलं.
 
त्यांनी तैवान मध्ये राहून निर्वासित सरकार स्थापन केलं.
 
तेव्हापासून आजपर्यंत चीनचे कम्युनिस्ट तैवानला आपल्या ताब्यात घेऊ शकलेले नाहीत.
 
अमेरिकेने यावर काय म्हटलंय?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, चीनने तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई यांच्या दौऱ्याच्या आडून फायदा घेऊ नये.
 
चीनने 'संयम आणि जैसे थे परिस्थिती' ठेवावी असं ही त्यांनी सांगितलं आहे.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, चीनच्या हालचालींवर अमेरिकेची बारीक नजर आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "या प्रदेशात अमेरिकेकडे पुरेशी संसाधने आणि संरक्षण क्षमता आहे. यातून आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशिवाय शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करू शकतो."
 
अमेरिकेने 1979 मध्ये तैवानशी संबंध तोडले होते. पण तैवानला स्वसंरक्षणासाठी संसाधने उपलब्ध करून देण्यास अमेरिका कायद्याने बांधील आहे.
 
शिवाय चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिका हस्तक्षेप करेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कित्येकदा बोलून दाखवलं आहे. पण चीनवर याचा फारसा परिणाम झालेला नाही.
 
गेल्या वर्षी अमेरिकेच्या सभागृहाच्या माझी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर चीनने नाराज व्यक्त केली होती.
 
तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो, पण तैवान आपलाच भाग असल्याचं चीन म्हणतो. त्यामुळे आज नाही तर उद्या, पण कधीतरी तैवान आपल्यात सामील होईल असा चीनचा विश्वास आहे.
तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका दौरा
बुधवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा साई यांनी अमेरिकन हाऊसचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमेरिकेने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले होते.
 
त्या म्हणाल्या की, "यातून तैवानचे लोक एकटे नसल्याचा विश्वास मिळतो."
 
मॅकार्थी स्वतःच तैवानला भेट देणार होते पण चीनसोबतचा तणाव वाढू नये यासाठी ही बैठक कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आली.
 
चीनची कारवाई आणि तैवानची प्रतिक्रिया
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं की, "या युद्ध सरावादरम्यान पेट्रोलिंग करण्यात येईल आणि तैवानच्या दिशेने सैन्य पुढे जाईल. तैवानला चारी बाजूंनी घेरण्यात येईल."
 
या सरकारी प्रसारमाध्यमांनी पुढे सांगितलं की, चीनच्या सैन्याने लांब पल्ल्याचे रॉकेट, क्षेपणास्त्र नौका, लढाऊ विमाने, बॉम्बर, जॅमर आणि हवाई इंधन भरणारी विमान तैनात केली आहेत.
 
चीनच्या या कारवाईवर तैवानच्या राजधानीतील लोक फार चिंतेत दिसले नाहीत.
 
तैपेईतील एक नागरिक, जिम साई म्हणाले की, "मला वाटतं की, तैवानच्या नागरिकांना याची सवय झाली आहे. हे नेहमीच झालंय."
 
मायकल चुआंग सांगतात की, "असं वाटतं की चीनला हे सगळं करायला आवडत आहे. ते तैवानला अशा पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न करतात जसं काय, तैवानवर त्यांचा मालकी हक्क आहे. आम्हाला आता याची सवय झाली आहे."
 
ते म्हणतात की, "त्यांनी हल्ला केला तरी आम्हाला लपायला जागा नाहीये. भविष्यात काय घडेल याचा अंदाज लावून मगच आम्ही पुढची वाटचाल करतो."
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती