बोरिस जॉन्सन होणार युकेचे नवे पंतप्रधान, जेरेमी हंट पराभूत

टोरी लीडरशिप निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांनी जेरेमी हंट यांचा पराभव केला. बोरिस जॉन्सन हे युकेचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
 
थेरेसा मे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यामुळे आता नवीन पंतप्रधानाची निवड करण्यात आली. पण त्यासाठी संपूर्ण देशात सार्वत्रिक निवडणुका होत नसून हुजूर पक्षांतर्गत याचा निर्णय घेण्यात आला. याच निवडणुकांना टोरी लीडरशिप निवडणुका असं म्हणतात.
 
कन्झर्व्हेटिव्ह अर्थात हुजूर पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची ही निवडणूक 10 जून रोजी सुरू झाली होती. त्यावेळी या स्पर्धेत 10 उमेदवार होते. यासाठी हुजूर पक्षाअंतर्गत मतदान झालं. या मतदानानुसार जो हुजूर पक्षाचा नेता होईल तोच देशाचा नवा पंतप्रधान असेल.
 
'टोरिझम' या राजकीय विचारसरणीने प्रेरित व्यक्तीला 'टोरी' म्हटलं जातं. अशा 1,60,000 टोरी मतदारांनी दिलेला कल आज लंडनमध्ये जाहीर करण्यात येईल.
 
विजयी झालेली ही व्यक्ती बुधवारी पंतप्रधानपदी विराजमान होईल.
 
लंडनचे महापौर राहिलेले बोरीस जॉन्सन हे या पदासाठीचे प्रबळ दावेदार जरी मानले जात असले, तरी अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण काम करणार नसल्याचं म्हटलं आहे.
 
थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट विषयक धोरणांविरोधात कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी बंड केल्यानंतर थेरेसा मे पायउतार झाल्या आहेत. मंगळवारी त्या त्यांची शेवटची कॅबिनेट बैठक घेतली.
 
बुधवारी दुपारी त्या त्यांचा राजीनामा राणीसमोर सादर करतील. त्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन थोड्याच वेळात त्यांचा उत्तराधिकारी त्यांची जागा घेईल.
 
कोण आहेत बोरिस जॉन्सन?
बोरिस जॉन्सन हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. ब्रेक्झिटविषयीची थेरेसा मे यांची धोरणं न पटल्याने ते कॅबिनेटमधून बाहेर पडले होते.
 
2008 ते 2016 या काळात ते लंडनचे महापौर होते.
 
गेल्या महिन्यामध्ये जॉन्सन हे या निवडणुकीसाठीच्या अंतिम दोन उमेदवारांपैकी एक ठरले. जेरेमी हंट यांनी जॉन्सन यांना कडवी टक्कर देण्याचं म्हटलं असलं तरी जॉन्सन यांना दोघांपैकी प्रबळ दावेदार मानलं गेलं. कारण होतं - ब्रेक्झिटविषयीची या उमेदवारांची भूमिका.
 
बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावं यासाठीच्या 'Vote Leave' मोहिमेचं नेतृत्त्वं केलं होतं. तर ब्रेक्झिटसाठीचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये जेरेमी हंट यांनी 'Remain' म्हणजेच युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनने रहावं असं मतदान केलं होतं.
 
कर्न्झर्व्हेटिव्ह पक्ष ही युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावं या मताचा आहे. आणि हंट नुकतेच या मतप्रवाहामध्ये सामील झालेले असले तरी आपला भावी नेता हा पूर्णपणे या मताचा असावा असं अनेक टोरी सदस्यांना वाटतंय.
 
म्हणूनच नेता निवडीसाठीच्या मतदानादरम्यान याचा फायदा बोरिस जॉन्सन यांना झाला असल्याचा अंदाज आहे.
 
बोरिस जॉन्सन यांनी आतापर्यंत अनेक पदं भूषवली, आणि जवळपास प्रत्येक वेळी ते वादात सापडले आहेत.
 
2004मध्ये ते 'स्पेक्टॅटर मॅगझिन'चे संपादक असताना त्यांना लिव्हरपूलमध्ये जाऊन माफी मागावी लागली होती. केन बिगले या ब्रिटीश कंत्राटदाराला ओलीस धरून त्याची इराकमध्ये हत्या करण्यात आली होती. लिव्हरपूलच्या लोकांनी यावर जरा जास्तच प्रतिक्रिया दिल्याचं मत जॉन्सन यांनी मासिकातून व्यक्त केलं होतं. त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली.
 
लेबर पक्षाच्या केन लिव्हिंगस्टन यांना हरवत ते 2008मध्ये पहिल्यांदा लंडनचे महापौर झाले. लंडनमधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करताना दारू पिण्यावर जॉन्सन यांनी बंदी आणली. शिवाय शहरामध्ये सायकल भाडेतत्त्वाने देणारी योजना सुरू केली जी - बोरिस बाईक्स नावाने ओळखली जाते.
 
2011मध्ये लंडनमध्ये दंगली झाल्या त्यावेळी ते सुटीवर होते आणि लंडनमध्ये परतण्यासाठी त्यांनी उशीर केल्याची टीका सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आली होती
 
2012मध्ये ते पुन्हा लंडनचे महापौर झाले आणि लंडन ऑलिम्पिक्सच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. या दरम्यानचा सगळ्यात चर्चिला गेलेला क्षण म्हणजे युकेला पहिलं सुवर्णपदक मिळाल्यानंतर तो विजय साजरा करणारे बोरिस जॉन्सन झिप लाईनच्या वायरवर अडकले आणि लोंबकळत राहिले.
 
2015मध्ये ते खासदार झाले आणि 2016मध्ये पंतप्रधान झालेल्या थेरेसा मे यांनी त्यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक केली. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून त्यांनी केलेला प्रचार लक्षात घेता त्यांना हे पद देण्यात आलं असावं, अशी चर्चा त्यावेळी होती.
 
ब्रिटीश - इराणी नागरिक असणाऱ्या नाझनीन झगारी-रॅटक्लिफ यांना इराणमध्ये अटक करण्यात आली. त्यावेळी त्या तिथे सुटीवर गेल्या असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या इराणमध्ये पत्रकारांनी शिकवत असल्याचं विधान जॉन्सन यांनी केलं. त्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली. यानंतर इराणमध्ये नाझनीन यांना जजसमोर सादर करण्यात आलं आणि त्यांच्यावर इराणच्या राजवटीविरोधात प्रचार करण्याचा आरोप लावण्यात आला.
 
सौदी अरेबिया मध्य-पूर्वेमध्ये छुप्या युद्धात सामील होत असल्याची टीका जॉन्सन यांनी केली. आणि त्याबद्दल त्यांना डाऊनिंग स्ट्रीटच्या कानपिचक्या सहन कराव्या लागल्या.
 
बुरखाधारी मुस्लिम महिला या 'लेटरबॉक्सेस' सारख्या (पत्राच्या पेटीसारख्या) दिसतात असा उल्लेख जॉन्सन यांनी 2018मध्ये डेली टेलिग्राफमधल्या त्यांच्या लेखात केला. त्यानंतरही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
 
ब्रेक्झिटसाठीच्या मोहीमेचं त्यांनी नेतृत्त्वं केलं पण 2013मध्ये याच बोरिस जॉन्सन यांनी डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने युकेचे प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलं होतं.
 
ब्रेक्झिटविषयीच्या धोरणांवरूनच थेरेसा मे यांच्याशी बोरिस जॉन्सन यांचे मतभेद झाले आणि त्यांनी मे यांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता.
 
ब्रेक्झिटमुळे नेतृत्वबदल
 
टोरी प्रमुखपदासाठी महिनाभर चालेल्या प्रचारमोहिमेदरम्यान 'ब्रेक्झिट' महत्त्वाचा मुद्दा होता.
 
परराष्ट्र सचिव असणाऱ्या जेरेमी हंट यांचं असं म्हणणं होतं की, या ब्रेक्झिटबाबतची बोलणी करण्यासाठी ते अधिक पात्र आहेत. याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी हॅलोवीन (31 ऑक्टोबर)पर्यंतची मुदत असली, तरी अधिकचा कालावधी मागून घेण्याची त्यांची तयारी होती.
 
तर 31 ऑक्टोबरपर्यंत आपण युनायटेड किंग्डमला युरोपियन युनियनमधून बाहेर काढू, असं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं होतं. गरज पडल्यास कोणताही करार न करता बाहेर पडायची तयारीही त्यांनी दाखवली होती. आणि सर्व मंत्र्यांनी या विचारसरणीशी 'जुळवून' घ्यावं, असं देखील त्यांनी आधीच सूचित केलं आहे.
 
पण आपण या विचारसरणीला पाठिंबा देऊ शकत नाही, असं चॅन्सेलर फिलिप हॅमंड, जस्टिस सेक्रेटरी डेव्हिड गॉक आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठीचे सचिव रोरी स्टुअर्ट यांनी सांगितलं आहे. बोरिस जॉन्सन निवडून आल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं या तिघांनी म्हटलंय.
 
म्हणजेच जर जॉन्सन निवडून आले, तर कॅबिनेटमध्ये मोठे बदल होतील. बुधवारी जॉन्सन डाऊनिंग स्ट्रीटमध्ये दाखल झाले तर या बदलांना सुरुवात होईल.
 
ब्रेक्झिटसाठीचे माजी सचिव डॉमिनक राब यांनी स्काय न्यूजशी बोलताना सांगितलं की सध्या जॉन्सन हेच पक्षाला एकत्र आणण्याच्या स्थितीमध्ये आहेत कारण त्यांना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त खासदारांनी पाठिंबा दिला होता.
 
तर युरोपाशी चर्चा करण्यासाठी जॉन्सन हेच योग्य व्यक्ती असल्याचं कम्युनिटीज सेक्रेटरी जेम्स ब्रोकनशर यांनी चॅनल 4 न्यूजला सांगितलं.
 
युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी युकेच्या बाहेर पडण्याच्या अटी तयार करण्यासाठी आणि सोबतच संसदेमध्ये हे धोरण ठामपणे मांडण्यासाठी जॉन्सन योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. थेरेसा मे यांनी यासाठी मांडलेला प्रस्ताव तीन वेळा फेटाळण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती