इराकमध्ये लग्न समारंभात लागलेल्या आगीत किमान 100 जण ठार, वधू वरही गंभीररित्या भाजले

बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (11:28 IST)
उत्तर इराकमध्ये एका लग्नाच्या पार्टीत लागलेल्या आगीत किमान 100 लोकांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती तेथील सरकारी माध्यमांनी दिली आहे.
 
मृतांमध्ये वधू आणि वराचा समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. सुरुवातीला काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार दोघांचाही मृत्यू झाला आहे, पण निना वृत्तसंस्थेने नंतर दिलेल्या वृत्तानुसार दोघेही गंभीररीत्या भाजले असून, दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
ही आग मंगळवारी संध्याकाळी उशिरा इराकच्या उत्तर निनवाह प्रांतातील अल-हमदानिया जिल्ह्यात लागली.
 
इराकची वृत्त संस्था नीनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अग्निशमन दल आग विझवताना दिसत आहे आणि सोशल मीडियावरील स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यक्रमाच्या हॉलचे जळालेले अवशेष दिसत आहेत.
 
इमारतीतील ज्वलनशील घटकांमुळं आग पसरली असावी, असं इराकच्या नागरी संरक्षण संचालनालयानं सांगितलं आहे, नीना या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली.
 
"अत्यंत ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याचा वापर केल्यामुळं आग परसली. हॉलचा काही भाग आग लागल्यावर काही मिनिटातच कोसळला," असं संचालनालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
 
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या साईटवर चित्रित केलेल्या व्हीडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान बचावलेल्या लोकांना वाचवण्यासाठी इमारतीच्या ढिगाऱ्यावर चढताना दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री 10:45 च्या सुमारास इमारतीला आग लागली तेव्हा तेथे शेकडो लोक आनंदोत्सव साजरा करत होते.
 
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके पेटवल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक अहवालात सांगण्यात आलं आहे.
 
अधिकृत निवेदनानुसार इराकच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पाठवले होते.
 
इराकच्या पंतप्रधानांनी या दुर्दैवी घटनेतील पीडितांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिल्याचं असं त्यांच्या कार्यालयानं एक्स ( पूर्वी ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे
 
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती