खेळताना रंग बाई होळीचा!

आला शिमग्याचा हा सण । दारी आला ग साजण
संगे गडी गडणी घेऊन न । खेळू म्हणे रंग रंग रंग
शिमग्याची ही लावणी पारंपारिक लावणी कलावंतांकडून अनेकदा ऐकली. या लावणीवरील नृत्य आणि अदाकारी पाहिली. लावणीचे शब्द आणि लावणीची अदाकारी विलोभनीय होती. शिमगा, होळी आणि लावणीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण होळी, शिमगा म्हणजे रंगांची उधळण. ही रंगांची उधळण लावणीतही दिसते. शब्दांच्या रूपाने. 'खेळताना रंग बाई होळीचा होळीचा। फाटला ग कोना माझ्या चोळीचा ` ही लावणी होळीचे वर्णन करणारी लावणी. लावणीची जे अनेक प्रकार आहेत त्यात हौद्याची लावणी नावाचा प्रकार आहे. बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि पुण्याचे पेशवे यांच्या राजमहालात होळीचे, शिमग्याचे, रंगपंचमीचे रंग खेळण्यासाठी स्वतंत्र हौद असत. या हौदातून रंगांची रेलचेल असे. हे रंग खेळताना सादर होणार्‍या लावण्या म्हणजेच हौद्याच्या लावण्या होत.

छक्कड, जुन्नरी, बालेघाटी, पंढरपुरी बाजाची असे लावणीचे विविध प्रकार असून अनेक लावण्यांमध्ये होळी, शिमग्याचा व रंगांचा उल्लेख हमखास असतो. या सर्व लावण्यांचा मुख्य स्त्रोत संत वाङ्मयात आढळतो. संत वाङ्मयात 'पाच रंगांच्या पाच गौळणी` आहेत. कृष्णाने गौळणींवर रंग उडविल्याचा उल्लेख संत वाङ्मयात आढळतो. वसंतोत्सवाचे दर्शन घडविणार्‍या या रंगोत्सवाचे खरे सामर्थ्य या रंगोत्सवाच्या उत्स्फूर्ततेत आहे. षृंगार रसाच्या विविध छटांचे दर्षन घडविणार्‍या लावण्यांमध्ये रंगोत्सव आहे. पंढरपूरचे दिवंगत लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांनी होळीच्या अनेक लावण्या रचल्या आहेत. इतकेच नव्हे तर रंगपंचमीच्या दरम्यान पंढरपूरात उत्पात मंडळी लावणी गायनाचा महोत्सव साजरा करीत असतात. आजही ही परंपरा भागवताचार्य वा. ना. उत्पाद यांनी सुरू ठेवली आहे. 'श्रीरंगा सारंगधरा मी लाजून धरते करा, चला निघा माझ्या मंदिरा, उडवा रंग रंग रंग। ही षाहीर पठठ्बापूरावची गौळण प्रसिध्द आहे. शाहीर पठठ्बापूरावच नव्हे तर प्रभाकर, होनाजी बाळ, रामजोशी, अनंत फंदी अशा अनेक शाहिरांनी होळीच्या लावण्या आणि गौळणी रचल्या आहेत. ज्यातून लावणीच्या शब्दकलेतून रंगांचा उत्सव दृग्गोचर होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती