कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

बुधवार, 24 एप्रिल 2024 (07:32 IST)
एके दिवशी अगस्ती ऋषींच्या आश्रमात बंधु लक्ष्मणासह श्रीराम गेले असता, ऋषींनी त्यांचा योग्यप्रकारे आदरसत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास प्रेमभरे अर्पण केले. तेव्हा श्रीराम म्हणाले, 'मुनिवर्य, वास्तविक मीच तुम्हाला काही तरी अर्पण केले पाहिजे, त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात.' त्यावर ऋषी म्हणाले, 'आम्हा तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचे? तू विष्णूंचा अवतार असून अयोध्येचा राजा आहेस. तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल.' ऋषिंचे हे वाक्य ऐकताच, `हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले?' असा श्रीरामाने प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, हे श्रीरामा, या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे. तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो. एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला. मी वर पाहिले, तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले. पाहता पाहता, ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले. 
 
थोडया वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते. त्या प्रेताजवळ तो गेला. त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले. मग तो विमानात बसून निघून गेला. तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो. दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली. हा प्रकार काय आहे, ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली. 
 
ते दिव्यपुरुष म्हणाले, `मी स्वर्गभुवनात राहतो. पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही. म्हणून मृत्यूलोकी येऊन क्षुधाशांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो.'
 
हे ऐकून मला नवल वाटले, मी विचारले, 'स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृतपान करायला मिळते असे ऐकले आहे. अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही.'
 
दिव्य पुरुष म्हणाला, `तुम्ही म्हणता, ते सत्य आहे. पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही. मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो. प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो. कोणाशी कधीच वाईट वागलो नाही. मात्र, माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला, गरजवंतांना अन्नदान झाले नाही. माझे जीवन मी असेच व्यतीत केले. प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले. तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले. मात्र, जेव्हा भूक लागली, तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही. याचे कारण विचारले असता, चित्रगुप्त म्हणाले, 'पूर्वी तू अन्नदान केले असते, तर तुला इथे भोजन मिळाले असते. तेव्हा तू ते केले नाहीस. स्वत:च्या पोटापाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वत:च्या भोजनाची व्यवस्था स्वत:च कर. त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला.'
 
दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्ती ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य त्या दिव्य पुरुषाला दान दिले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नांचे कंकण दिले. त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून कधी घडू नये, म्हणून अगस्ती ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले.
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती