तिन्हीसांजेला दिवा लावण्याचे महत्त्व

मंगळवार, 20 एप्रिल 2021 (09:36 IST)
हिंदू संस्कृतीत दिवा लावण्याचे अत्यंत महत्तव आहे. त्यातून तिन्हीसांजेला दिवा लावत असल्याचे आपण लहानपणापासून बघत आहोत. यामागील कारण देखील तसंच महत्त्वाचं आहे. पुराणांनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर संचार करत असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे सूक्ष्म जीवजंतू, विषाणू, रोगजंतू मारले जातात. मात्र, सूर्यास्तानंतर सूर्य किरणे पृथ्वीवर नसल्यामुळे वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी, यासाठी तिन्हीसांजेला दिवे लावण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून सुरु असलेली परंपरा आजदेखील कायम असून संध्याकाळी घरात देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावला जातो. काही घरांमध्ये तिन्हीसांजेला धूपही घातला जातो ज्याने घरातील विषाणू नष्ट होतात. दिवा आणि धूप याने घरात सकारात्मकता येते. वातावरण शुद्ध होतं.
 
​देवासमोर या प्रकारे लावावा दिवा 
देवपूजा करताना सुरुवातीलाच दिवा लावला जातो. देवासमोर तेलाचा आणि तुपाचा दिवा लावला जातो. आता कोणता दिवा लावावा अशा प्रश्न मनात असेल तर कोणताही दिवा लावलेला चालतो. मात्र, तुपाच्या दिव्याने अधिक प्रमाणात सकारात्मकता येते, असे म्हटले जाते. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असून तूप अग्नी यांचा संबंध झाल्यावर वातावरण पवित्र होतं. दिवा लावल्याने प्रदूषण दूर होतं. 
 
​दिवा लावण्याची योग्य दिशा कोणती
दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचे नियम सांगण्यात आले आहे. आपण तेलाचा दिवा लावत असाल तर आपल्या डाव्या हाताला ठेवावा. आपण तुपाचा दिवा लावत असाल तर आपल्या उजव्या हाताला ठेवावा. धन लाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. उत्तम आरोग्यासाठी दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. दिव्याची वात लावण्यासाठी या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. तसेच दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी कारण ही दिशा यमाची असून दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात लावू नये.
 
​दिवा विझल्यावर घाबरु नये
देवासमोर लावलेला दिवा विझला तर काहीतरी अशुभ घडेल अशी काळजी करु नये. दिवा जळत असताना अचानक विझला किंवा लावताना विझला तर अशुभ घडतं असे कुठल्याही धर्म शास्त्रात आढळलेलं नाही. त्यामुळे दिवा विझल्यास न घाबरता देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करावी आणि दिवा पुन्हा प्रज्ज्वलित करावा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती