श्री एकनाथ षष्ठी....

शनिवार, 14 मार्च 2020 (11:44 IST)
संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत.! त्यांचे जन्मस्थान गोदावरी काठावरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.!
 
संत एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्ठीलाच साजरी करत... पारंपरिक मराठी पंचांग, दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ षष्ठी साजरी केली जाते...
 
या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, असे मानले जाते... संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते... एकनाथी भागवतातील १८ हजार ८०० ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद् भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले...
 
संत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितलेले आहे...
श्री एकनाथ महाराजांच्या घराण्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत... संत एकनाथ महाराजांना नाथही संबोधतात... नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे... पुढे त्यांनी पंढरपुरात सोळखांबी येथे समाधी घेतली... सोळखांबीतून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाताना उजव्या हाताची पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे...
ज्या ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटला जातो, त्या ज्ञानेश्वरांची समाधी २५० वर्षानंतर लोकांच्या विस्मरणात गेली... परंतु नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला... समाधीचा चौथरा आणि गाभारा नाथांनी बांधला... आळंदीची वारी पुन्हा सुरु केली... ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली... नाथांची लेखणी लोकोद्धारासाठीच झिजली, तळमळली, तळपली.!
संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते... त्यांनी भारुड, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. कृतीतून दाखवूनही दिले... डोळस कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले...
संत कवींनी संपन्न केलेल्या भारुड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली... अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली... त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या... भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करुन भारुडातून रुढी परंपरांवर प्रहार केले आहेत... दोनशेपक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत...
 
संत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू आहेत... समकालिनांना ते आदर्श आहेत, तसेच आधुनिकांनाही.! संत एकनाथांनी ब्रम्हविद्येचा सुकाळ होता त्यावेळी सामान्यांच्या कल्याणासाठी ग्रंथसंपदा निर्मित केली... इतर संतांपेक्षाही ती अधिक अशीच आहे... त्यात विविधता आहे. यामध्ये चतु:श्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत... तर हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद यासारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणे, काही पौराणिक आख्याने व संत चरित्रे आणि असंख्य अभंग व भारुडे आहेत... संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचेही पहिल्यांदा शुद्धीकरण करुन ती शुद्ध प्रत लोकांना दिली... त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान मिळतो... त्यांच्या या प्रचंड वाङ्मयाने केलेले लोकविलक्षण कार्य पाहून संत एकनाथ महाराज हेच महाराष्ट्राचे खरे नाथ आहेत.!
 
मराठवाडा संतांची भूमी.! त्या संतांच्या भूमीतील संत एकनाथांनी लोकोद्धाराचे महनीय, अतुलनीय असेच कार्य केलेले आहे नव्हे तर कृतीतून त्यांनी करुन दाखविले आहे... आधी केले मग सांगितले या उक्तीला आयुष्यभर महत्त्व देऊन प्राणीमात्रांबरोबर, सामान्यांतही देव त्यांनी शोधला... गुरु जनार्दन स्वामींकडून योगशास्त्राचे धडे घेतले... त्यांच्या आग्रहानुसारच गृहास्थाश्रमही स्वीकारले... भारत भ्रमणानंतर जीवनभर नाथांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले... भक्तीची वाट दाखवली... जातीभेद, कर्मकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला... संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांनी पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी तेजाने तळपत ठेवली... कीर्तन, भारुडातून समतेची शिकवण दिली आहे... त्यांच्या या शिकवणीतून आपणही प्राणीमात्रांवर दयेचा, मानव कल्याणचा संकल्प करुयात, त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरुया... भाविकांच्या या श्रीनाथ षष्ठी सोहळ्यासाठी व सोहळ्याच्या  शुभेच्छा देऊन शांती ब्रम्ह संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया.!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती